पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीमधील साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. येथील निवडणुकासाठी रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली होती. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत त्यांच्या गप्पा गोष्टीही महाराष्ट्राने या निवडणुकांच्या निमित्ताने पाहिल्या. आता या निवडणुकांच्या निकालाचे कल हाती येत असून अजित पवारांच्या नेतृत्वातील पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती प्रचारप्रमुख किरण गुजर यांनी दिली. त्यामुळे, अजित पवार गटाच्या खांद्यावरच या निवडणुकांचा गुलाल पडणार आहे.
अवघ्या महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी दिली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया बॅलट पेपरवर असल्याने मतमोजणीस विलंब होत आहे. मात्र, सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व कल हाती येतील तर रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल, असेही किरण गुजर यांनी सांगितले. सभासदांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावरती विश्वास दाखवत पॅनल टू पॅनल मतदान केल्याचेही किरण गुजर यांनी सांगितले.