अमेरिका युद्धमैदानात, हल्ल्यासाठी बी-२ घातक बॉम्बर वापरले
तेहरान : वृत्तसंस्था
इस्रायल-इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि एस्फाहान या तीन अणू प्रकल्पांवर शक्तीशाली बंकर बस्टर बॉम्ब टाकले. या बॉम्बला जीबीयू-५७ सुद्धा म्हटले जाते. जीबीयू-५७ हा २० फूट लांब १३,६०० किलो वजनाचा बॉम्ब आहे. हा बॉम्ब फक्त बी-२ बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो. इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्याही मित्र देशाकडे इतके शक्तीशाली विमान आणि जीबीयू-५७ हा बॉम्ब नाही. हा बॉम्ब फक्त बी-२ बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो. इराणचे फोर्डो आणि नतांज हे असे दोन आण्विक तळ आहेत, जे भूगर्भात जमिनीखाली उभारण्यात आले आहेत. मिसाइल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या साध्या बॉम्बने हे तळ नष्ट होऊ शकत नाहीत. त्यासाठी जीबीयू-५७ सारख्याच बॉम्बची आवश्यकता आहे. १३,६०० किलो वजनाचा एक बॉम्ब आहे, तीन प्रकल्प आहेत, त्यामुळे अमेरिकेने असे किती बॉम्ब वापरले हे अजून स्पष्ट नाही.
बी-२ स्पिरिट बॉम्बरने शनिवारच्या मध्यरात्री इराणच्या तीन अणवस्त्र ठिकाणांवर बॉम्बहल्ला केला. इराणने अणूबॉम्ब बनवण्यासाठी बनवलेले इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट केले. फॉर्डोचा प्लान्ट म्हणजे अभेद्य किल्ला होता. याला इराणच्या न्यूक्लियर कार्यक्रमाचे क्राऊन ज्वेल म्हटले जायचे. फॉर्डो आता इतिहास बनले. ट्रम्प यांनी हे ऑपरेशन यशस्वी झाल्याच म्हटले आहे.
अमेरिकेने या ऑपरेशनसाठी आपल्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक बी-२ स्पिरिट बॉम्बर विमान वापरले. अमेरिका अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत या विमानाचा वापर करते. सर्वात मोठ्या वजनाचा बॉम्ब वाहून नेण्यासह बी-२ स्पिरिटची आणखी एक खासियत म्हणजे एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देण्याची क्षमता आहे. शत्रूच्या प्रदेशात बॉम्बवर्षाव करण्यासह जमिनीखाली खोलवर असलेले लक्ष्य उद्ध्वस्त करणे हे बी-२ स्पिरिटच आणखी एक वैशिष्ट्य.