पाकचा जीडीपी ३७५ अब्ज डॉलर, ३२ दिवसांत अमेरिकेचे ४०० अब्ज डॉलर्सचे नुकसान
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी बाजाराचे कामकाज सुरू होताच जवळपास ५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. वॉल स्ट्रिटवर व्यवहार सुरु होताच सगळे प्रमुख निर्देशांक धडाधड कोसळले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे गुंतवणूकदार धास्तावले असून, सर्वाधिक नुकसान अमेरिकेचेच होत आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफचे गंभीर परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटते. अमेरिकेच्या बाजारात मागील ३२ दिवस रोज जवळपास ४०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले. ही रक्कम पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानचा जीडीपी ३७५ अब्ज डॉलर आहे. ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेला रोज एका पाकिस्तानच्या जीडीपीइतके नुकसान सहन करावे लागत आहे.
ट्रम्प यांनी जगभरातील ६० पेक्षा अधिक देशांविरोधातील टॅरिफ वाढवला आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये हाहाकार माजला आहे. गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये पाण्यात गेले आहेत. सर्वाधिक नुकसान अमेरिकेचेच झाले आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या टेक कंपन्यांच्या शेअर्सचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सध्याच्या घडीला जगातील कोणत्याही कंपनीचे बाजारमूल्य ३ ट्रिलियन डॉलर राहिलेले नाही. काही दिवसांपूर्वी इतके बाजारमूल्य असलेल्या अनेक कंपन्या होत्या. मात्र टॅरिफ वॉर सुरु झाल्यापासून यातील अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले आणि कंपन्यांचे बाजारमूल्य झपाट्याने कमी झाले.
३२ दिवसांपूर्वी एसअँडपी ५००नं ६१४७ अंकांपर्यंत मजल मारत विक्रम केला. मात्र त्यानंतर सुरु झालेली घसरण आजतागायत कायम आहे. अॅपल कंपनीचे शेअर्स ७.२९ टक्क्यांनी कोसळले. त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य थेट २.८२९ ट्रिलियन डॉलरवर आले. ही कंपनी जगातील दुसरी मोठी कंपनी आहे. तर एआय चिप तयार करणा-या एनवीडिया कंपनीचे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलरवरुन २.३०१ ट्रिलियन डॉलरवर आले आहे. या कंपन्याचं बाजारमूल्य कधीकाळी ३ ट्रिलियन डॉलरहून अधिक होते.
अमेरिकन शेअर्सचे मूल्य घटले
१९ फेब्रुवारीपासून एप्रिल २०२५ पर्यंत अमेरिकन शेअर्सचे मूल्य १३ ट्रिलियन डॉलरने कमी झालं आहे. केवळ मॅग्निफिशियंट ७ कंपन्यांचे बाजारमूल्य ५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त घटले आहे. अमेरिकेचा एसअँडपी ५०० फ्युचर्स इंडेक्स २२ टक्क्यांनी खाली आला. अमेरिकेच्या बाजारात मागील ३२ दिवस दररोज जवळपास ४०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. ही रक्कम पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.