पीकविमा घोटाळा, नांदेडमध्ये ४० सीएससी सेंटरवर गुन्हा
नांदेड : प्रतिनिधी
तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात बोगस पीकविमा भरल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. आता या बोगस पीकविमा प्रकरणी नांदेड जिल्ह्यात ४० सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेतक-यांचा सात बारा, स्वयं घोषणापत्र, बँक पासबुक यासह इतर कागदपत्रे घेऊन सीएससी चालकांनी तब्बल ४ हजार ४५३ शेतक-यांचा बोगस पीक विमा काढल्याचे प्रकरण समोर आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नांदेडमध्ये सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस पीकविमा भरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी नांदेड, परळी (बीड) आणि पुणे अशा ४० सुविधा केंद्र चालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बोगस पीक विम्यासाठी सेतू चालकांकडून नांदेड, परभणी, बीड, लातूर, जालना, पुणे आणि उत्तर प्रदेशातील शेतक-यांचा नावाचा बनावट पद्धतीने वापर करण्यात आला होता.
बीड पाठोपाठ आता नांदेडमध्येही बोगस पीकविमाचा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शेतक-यांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा भरला जातो. गतवर्षी म्हणजेच २०२४ मध्ये नांदेडमध्ये शेतक-यांनी पीकविमा भरला होता.पिकविम्याचे पैसे उकळण्यासाठी नांदेड, बीड आणि पुणे येथील ४० सेतू चालकांनी तब्बल ४ हजार ४५४ शेतक-यांच्या नावावर शासकीय आणि शेतक-यांच्या जमिनीचा बोगस पद्धतीने वापर करून पीकविमा भरला होता.
४ मार्च २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय पीकविमा आढावा बैठकीत बोगस पीकविम्याचा विषय मांडण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बोगस अर्ज दाखल केलेल्या सामाईक सुविधा केंद्रचालकांची माहिती मागितली होती. कृषी विभागाच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे कृषी अधिकारी माधव चामे यांच्या तक्रारीवरून नांदेड, परळी व पुणे अशा ४० सुविधा केंद्र चालकाविरोधात नांदेडच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान बीड जिल्ह्यात असाच पीकविमा घोटाळा उघडकीस आला होता. आता नांदेड जिल्ह्यातही असाच प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे या घोटाळ््याची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.