भारताचा कोलदांडा, बांगलादेशाच्या ४२ टक्के वस्तूंवर बंदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलत असताना आता भारताने चीनची री ओढणा-या बांगलादेशालाही मोठा धडा शिकविला आहे. भारताने बांगलादेशातून आयात होणा-या ४२ टक्के वस्तूंवर बंदी घातली. यामुळे बांगलादेशला सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे (७७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) नुकसान होणार आहे.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हनुसार हे दोन्ही देशांच्या आयातीच्या सुमारे ४२ टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या निर्देशांनंतर हा आदेश जारी करण्यात आला. या निर्णयामुळे बांगलादेशातून फक्त तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्न आणि प्लास्टिकच्या वस्तू यासारख्या वस्तू काही विशिष्ट बंदरांमधून भारतात येऊ शकतील. काही वस्तूंच्या जमिनीवरून वाहतुकीला भारतात पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
यामध्ये बांगलादेशातून दरवर्षी आयात होणारे सुमारे ६१८ दशलक्ष डॉलर किमतीचे तयार कपडे आता फक्त कोलकाता आणि नावाशेवा बंदरांमधूनच येऊ शकतील. पूर्वी हे कपडे जमिनीच्या मार्गानेही भारतात आणले जात होते. याचा फटका बांगलादेशाला बसला.
बांगलादेशची चीनशी वाढती मैत्री पाहून भारताने हे पाऊल उचलल्याचेही अहवालात म्हटले आहे. अलीकडेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी चीनचा दौरा केला होता. या दौ-यात दोन्ही देशांमध्ये २.१ अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक आणि सहकार्य करारही झाला. युनूस यांनी चीनमध्ये भारताबाबत केलेली विधाने त्यांना महागात पडली. दरम्यान, पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशची अर्थव्यवस्थाही मंदीच्या गर्तेत गेली आहे. याला तोंड देण्यासाठी बांगलादेशने अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पुढे केला होता. त्यांनी ७६२ दशलक्ष डॉलर्सची मदत मागितली आहे.
बांगलादेशाला प्रत्युत्तर
भारताने हे पाऊल एकट्याने उचललेले नाही तर ते बांगलादेशने केलेल्या कारवाईला दिलेले प्रत्युत्तर आहे. बांगलादेशने २०२४ च्या अखेरीस अनेक भारतीय वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली. यामध्ये एप्रिल २०२५ पासून जमिनीवरून भारतीय धाग्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली. तांदळासारख्या अनेक वस्तूंच्या शिपमेंटवर नियम कडक करण्यात आले. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले.