प्रथमच नव्या ९ खेळाडूंचा समावेश, ऋषभ पंतला बढती
मुंबई : प्रतिनिधी
बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबत वार्षिक करार केला असून, या करारात एकूण ३४ खेळाडूंचा समावेश करण्यात आला. पहिल्यांदाच ९ नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला. तसेच श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनाही दिलासा मिळाला. कारण त्यांना कायम ठेवण्यात आले आहे. या यादीत ऋषभ पंत या एकाच खेळाडूला बढती दिली. त्याला ब श्रेणीतून अ श्रेणीत बढती देण्यात आली.
या वार्षिक करारात पहिल्यांदाच ५ खेळाडू्ंना संधी दिली. या खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश केला. यामध्ये वेगवान गोलंदाज हर्षित राणा याची पहिल्यांदा वार्षिक करारासाठी निवड करण्यात आली. हर्षितने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. हर्षितने टीम इंडियाचे २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि १ टी २० सामन्यात प्रतिनिधित्व केले. बीसीसीआयने नितीशकुमार रेड्डी याचीही वार्षिक करारात पहिल्यांदा निवड केली. नितीशकुमार रेड्डी टीम इंडियासाठी ५ टेस्ट आणि ४ टी २० सामने खेळली आहेत. टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने गेल्या काही महिन्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अभिषेकने टीम इंडियाचे १७ टी २० सामन्यांमध्ये २ शतकांसह ५३५ धावा केल्या आहेत.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली. वरुणने ३ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेत निर्णायक योगदान दिले. तेव्हापासूनच वरुणला वार्षिक करारात स्थान मिळणार असल्याचे म्हटले जात होते. आकाश दीप यालाही वार्षिक करारात पहिल्यांदा स्थान मिळाले. आकाशने टीम इंडियाचे ७ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याने या ७ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या. या ५ खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला. या खेळाडूंना प्रत्येकी १-१ कोटी रुपये मिळणार आहेत.
अश्विनला वगळले,
ऋषभ पंतला संधी
बीसीसीआय दरवर्षी ब श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी रुपये तर अ श्रेणीतील खेळाडूंसाठी ५ कोटी रुपये दिले जातात. बीसीसीआयने अ श्रेणीत एकूण ६ खेळाडूंचा समावेश केला आहे. मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांनी त्यांचे स्थान कायम ठेवले तर आर अश्विनला वगळण्यात आले असून त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली.