भारत-पाकिस्तानमध्ये सामंजस्य करार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली. शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पाकिस्तानच्या डीजीएमओने दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओंना फोन केला. दोन्ही बाजूंनी संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमीन, हवा आणि समुद्रात सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाली. पाक डीजीएमओ यांनी चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर चर्चा झाली आणि एकमत झाले. आता यावर १२ मे रोजी सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करणार आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाला आहे. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती देत दोन्ही देशांचे अभिनंदन करत आभार मानले होते.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणावर होता. या तणावानंतर भारताने ७ मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन्ही बाजूंनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले वाढले होते. परंतु भारताने मजबूत रणनिती आखून पाकिस्तानला तोंडघशी पाडले होते. दुसरीकडे भारताने थेट पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ले चढवून अक्षरश: चिंधड्या उडविल्या. दरम्यान, शनिवारी पाकिस्तानने युद्धविरामासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनीही संवाद साधल्याचे समजते. अखेर सायंकाळी ५ पासून युद्धविराम झाला.