लांबच लांब रांगा, गुरूपौर्णिमा उत्सव उत्साहात
अक्कलकोट : प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेनिमित्त आज अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. कालपासूनच भाविक भक्त अक्कलकोटमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातूनदेखील भाविक मोठ्या संख्येने अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दर्शन रांगेत लांबचलांब गर्दी बघायला मिळत आहे.
गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी अक्कलकोट शहरात स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस असून, अक्कलकोटमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वामी समर्थांचे प्रमुख स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरातील त्यांच्या भव्य मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे. या निमित्ताने मंदिरात विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्त स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करत असून, गुरु-शिष्य परंपरेचे पालन करत आहेत. यंदा गुरुपौर्णिमा गुरुवारी १० जुलै रोजी असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने विशेष व्यवस्था केली असून, मंदिर २४ तास खुले ठेवण्यात आले आहे.
पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरातही गर्दी
गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून आणि महाराष्ट्रातून भाविक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी येथे येत आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आणि विद्युत रोषणाईदेखील केली आहे. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, जसे की अभिषेक, पूजा, आणि कीर्तन. भाविक मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचे दर्शन घेत आहेत आणि गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत. आज गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र प्रसंग साजरा केला जात आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध रूपांतील गुरूंचे मार्गदर्शन लाभते, आणि त्यांना नमन करत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुण्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून, रंगीबेरंगी फुलांच्या आरासाने मंदिरे नटली आहेत. या निमित्ताने पुणेकरांनी दर्शनासाठी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे.