बारामती : प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वर्चस्व मिळवले आहे. त्यांच्या निळकंठेश्वर पॅनलला २१ पैकी २० जागा मिळाल्या तर सहकार बचाव पॅनलने एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनलचा मात्र सुपडा साफ झाला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी जवळपास ३५ तास चालली. त्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व कायम राहिले तर विरोधी गटाकडून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत. परंतु यावेळी अजित पवार यांच्या पॅनलला तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलने चांगलीच झुंज दिली.
सहकारमहर्षी म्हणून ओळख असणा-या चंद्रराव तावरे यांनी सांगवी गटातून ३८० मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत आपल्या पॅनलचे प्रतिनिधित्व कारखान्यावर कायम ठेवले. अजित पवारांनी सातत्याने त्यांच्या वयाचा उल्लेख केला. वय ८५ झाले तरी थांबणार आहात की नाही.. असा सवाल त्यांनी विचारला होता. तसेच ८५ वयाचा माणूस कारखान्याचे भले करेल का असे म्हटले होते. उपमुख्यमंत्र्याने मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने प्रवास करावा, माळेगाव निवडणुकीत त्यांना एवढी गोडी का, असा सवाल तावरे यांनी विचारला होता.