महागाईचा उडाला भडका, ५० रुपये वाढ, उज्ज्वला गॅसचेही दर वाढले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत २ रुपयांची वाढ केल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासूनच ही वाढ लागू करण्यात आली आहे. उज्ज्वला योजने अंतर्गत असलेल्या ग्राहकांनाही हा निर्णय लागू असणार आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज सांगितले. जगभरात शेअर बाजारात हाहाकार उडालेला असताना केंद्र सरकारने भारतीयांच्या खिशावर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढविल्याने आता आता या गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये झाली आहे. तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅसची किंमतही वाढविण्यात आल्याने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या सिलेंडरची किंमत आता ५०० रुपयांवरून ५५० रुपये झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. आयात शुल्कवाढीचा अख्ख्या जगात परिणाम होणार असे म्हटले जात असताना आता त्याची झळ थेट सर्वसामान्यांना बसू लागली आहे.
मध्यरात्रीपासूनच दर लागू
नवीन किमती सोमवारी मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आल्या. तेल कंपन्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. त्यामुळे आता ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.