३ हजारांत वाहनधारकांना करता येणार वर्षभर प्रवास
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोट्यवधी लोकांना येत्या १५ ऑगस्टपासून टोल टॅक्समधून मोठी सवलत मिळणार आहे. सरकार १५ ऑगस्ट २०२५ पासून कार, जीप, व्हॅन यांसारख्या खाजगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक पास लागू केला जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास आणखी सोपा होणार आहे. हा पास एक वर्षासाठी वैध असणार आहे. केंद्र सरकार टोल धोरणाचा विचार करत असल्याची चर्चा ब-याच दिवसांपासून सुरू होती. सरकारच्या या घोषणेमुळे वाहनधारक सुटकेचा नि:श्वास सोडणार आहेत.
या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकार कार, जीप, व्हॅन यासारख्या खाजगी वाहनांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक पास जारी करण्याची तयारी करत आहे. ही पास योजना वर्षासाठी वैध असणार आहे. या पासची किंमत ३ हजार रुपये विशेषत: कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी, गैरव्यावसायिक वाहनांसाठी आहे. हा पास सक्रिय झाल्यानंतर एक वर्ष किंवा २०० ट्रिप (जे आधी पूर्ण होईल) साठी वैध असेल. वापरकर्ते राष्ट्रीय महामार्ग अॅपवरील एका विशेष विभाग आणि एनएचएआय आणि एमओआरटीएचच्या अधिकृत पोर्टलद्वारे पास सक्रिय आणि रिन्यू करू शकतात.
स्थानिक नागरिकांना
मिळणार मासिक पास
वारंवार विशिष्ट टोल प्लाझावरून जात असाल, तर त्यांना अॅड्रेस प्रूफ आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून मासिक पास मिळू शकतो. या पासची किंमत दरमहा ३४० रुपये आहे. जी वार्षिक ४,०८० रुपये होते. हा वार्षिक पास सक्रियतेच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० टोल पाससाठी, जे आधी असेल ते वैध असेल. यामुळे वारंवार टोल भरण्याची गरज राहणार नाही.
अधिकृत वेबसाईटवरून
लिंकद्वारे काढता येणार पास
लवकरच राजमार्ग यात्रा अॅप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर एक लिंक उपलब्ध करून दिली जाईल, ज्याद्वारे वार्षिक फास्टॅग पास सक्रिय आणि रिन्यू करता येणार आहेत.