३ डॉक्टरांविरुद्ध गुन्हा
मुंबई : महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना मोठ्याप्रमाणात वैद्यकीय लाभ मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बोगस नोंदी व कागदपत्रांच्या आधारावर उल्हासनगर येथील तीन डॉक्टरांनी पावणे पाच लाखांची रक्कम लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक देवानंद धनावडे यांच्या फिर्यादीवरून कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२५ रोजी तीन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अनुदुर्ग ढोणे (वय ४५, रा. कल्याण, ठाणे), डॉ. ईश्वर पवार (रा. धुळे) आणि डॉ. प्रदीप पाटील (वय ४१, रा. गौरीपाडा, ठाणे) अशी त्यांची नावे आहेत.
या तिघांनी २६ मे ते १० जुलै २०२३ दरम्यान १३ बनावट रुग्णांचे अर्ज सादर करून सुमारे ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणांत रुग्णांची नावे, वैद्यकीय कागदपत्रे, युटिलायझेशन सर्टिफिकेट आणि अंदाजपत्रके बनावट असल्याचे तपासात उघड झाले.
आरोपीनी बँक ऑफ बडोदा बँकेच्या खाते क्र. ७६१२०२००००२५६० (IFSC: BARBOVJMOHO) मध्ये ही रक्कम जमा केली. ११ जुलै २०२३ रोजी अर्ज क्रमांक ९६६८/२०२३ (रुग्णः अरविंद सोळखी, मेंदूच्या उपचारासाठी ३ लाख ७० हजार रुपये) आणि अर्ज क्रमांक ९६६७/२०२३ (रुग्णः भगवान भदाने, मेंदूच्या उपचारासाठी ३ लाख १० हजार रुपये) या दोन प्रकरणांमध्ये संशयास्पद बाबी समोर आल्या होत्या.
छाननीदरम्यान अरविंद सोळखी यांचे सरस्वती हॉस्पिटल, नालासोपारा येथे, तर भगवान भदाने यांचे गणपती हॉस्पिटल, अंबिवली येथे दाखल असल्याचे उघड झाले, जे अर्जातील माहितीशी विसंगत होते. त्यानंतर तत्कालीन प्रभारी अधिकारी शिरीष पालव यांनी १५ जुलै २०२३ रोजी पथकासह गणपती हॉस्पिटलची पाहणी केली, परंतु डॉ. ढोणे यांनी कोणतीही कागदपत्रे किंवा नोंदवही सादर केली नाहीत. रुग्णालयात ३५ बेड असल्याचा दावा असला, तरी प्रत्यक्षात २५ पेक्षा कमी बेड आढळले, तर ऑपरेशन थिएटर (ओटी) आणि आयसीयू बंद असून त्यातून दुर्गंधी येत असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकड़न सरू आहे.
डॉ. ढोणे यांना मुख्यमंत्री संचिवालयात १७ जुलै २०२३ रोजी चौकशीसाठी बोलावल्यानंतरही ते हजर झाले नाहीत. त्यांनी आपल्या जबाबात ईश्वर पवार आणि प्रदीप पाटील यांनी रुग्णालयाला पॅनेलवर घेण्यासाठी मदत केल्याचे सांगितले.
अर्जामध्ये रुग्ण किंवा नातेवाइकांच्या संपर्क क्रमांकाऐवजी पवार आणि पाटील यांचे क्रमांक नमूद असल्याचेही आढळून आले. डॉ. ढोणे यांनी ‘मुलाला शाळेतून आणण्यासाठी जायचे आहे, असे पथकाला सांगून रुग्णालयातून पलायन केले.
संबंधितांवर कठोर कारवाई – रामेश्वर नाईक
गरीब रुग्णांच्या पैशांवर डल्ला मारून फसवणूक करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. भविष्यात असा प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.