अहमदाबाद : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चा दि. ३ जून २०२५ रोजी रंगणारा अंतिम सामना हा एक ऐतिहासिक सामना ठरणार आहे. ३ जून २०२५ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांशी भिडणार असून विजेतेपदासाठी ही लढत रंगणार आहे. या दोन्ही संघांसाठी हा हंगाम आतापर्यंत खूप चांगला गेला आहे. लीग टप्प्यात हे संघ टॉप-२ मध्ये होते आणि आता जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. हा सामना चाहत्यांसाठीही खूप खास असणार आहे. कारण आयपीएलमध्ये तब्बल ९ वर्षांनंतर एक खास दृश्य पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे २०२२ नंतर प्रथमच एखादा नवीन संघ आयपीएलचे जेतेपद पटकावणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आता त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी उत्सुक असून त्याकडेच सगळे लक्ष केंद्रित केले आहे तर २०१६ नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा असे दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येत आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. याचा अर्थ असा की आयपीएलला यंदा, नवा, आठवा नवीन विजेता मिळेल आणि २०२२ नंतर पहिल्यांदाच एखादा नवीन संघ विजेतेपद जिंकेल.
यापूर्वी २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा दोन्ही संघांना एकही विजेतेपद मिळालेले नव्हते. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला हरवून पहिले विजेतेपद जिंकले. मात्र, त्यानंतर २०१७ ते १०२४ पर्यंत प्रत्येक अंतिम फेरीत किमान एक संघ असा होता, ज्याने आधी विजेतेपद जिंकले होते. उदा, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स किंवा कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश होता.
२०२२ नंतर नवा चँपियन
२०२२ मध्ये गुजरात टायटन्सने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले, त्यांच्या पदार्पणाच्या हंगामातच त्यांनी ही मोठी कामगिरी केली. त्यानंतर २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद जिंकले, हे संघ यापूर्वी देखील चॅम्पियन होते. पण यंदा म्हणजेच २०२५ मध्ये आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यातील अंतिम सामन्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच एका नवीन चॅम्पियन संघाचा उदय होणार आहे. कारण आरसीबी आणि पंजाब किंग्जने या अगोदर कधीही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही.
आता ८ चॅम्पियन संघ उदयास येणार
आयपीएलच्या १७ हंगामांत आतापर्यंत ७ संघ चॅम्पियन बनले आहेत. राजस्थान रॉयल्स (२००८), डेक्कन चार्जर्स (२००९), चेन्नई सुपर किंग्स (२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३), कोलकाता नाइट रायडर्स (२०१२, २०१४, २०२४), मुंबई इंडियन्स (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०), सनरायजर्स हैदराबाद (२०१६) आणि गुजरात टायटन्स (२०२२) यांनी विजेतेपद मिळवले. आता २०२५ मध्ये पंजाब किंवा बंगळुरू कोणताही संघ जिंकला तरी आयपीएलला नवा, ८ वा चँपियन मिळणार आहे.