मुंंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी २२ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होता. आज संग्राम थोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच संग्राम थोपटे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
संग्राम थोपटे म्हणाले की, गेल्या चार दिवस तुम्ही चॅनेलवर पाहत होता. संग्राम थोपटे काय निर्णय घेणार? याकडे सगळ््यांचे लक्ष होते. दोन दिवसांपूर्वी माझी भूमिका मी स्पष्ट केली. मला अनेकांनी प्रश्न विचारला तुम्ही काँग्रेस का सोडताय? ही वेळ माझ्यावर काँग्रेसनेच आणली. विखे पाटील मला विधिमंडळात सांगायचे संग्राम निर्णय घे. इतर सहकारीसुद्धा सांगायचे की निर्णय घे. मी त्यांना सांगायचो की, मी निर्णय घेऊ शकत नाही. किती दिवस अन्याय होतोय, निर्णय घे असे म्हणायचे. मी विचाराला बांधलेला कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिले असेल काही कारणामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले.
काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला
संग्राम थोपटे पुढे म्हणाले की, लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी धर्म पाळला होता. काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केलं. मात्र त्या निष्ठेचे फळ मिळालं नाही. तळागाळात काँग्रेस वाढविण्याचा काम आम्ही केलं. थोडसं दु:ख वाटतंय, खंत वाटते. काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला आणि आज या निर्णयावर पोहोचलो आहे. भाजप देशाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असणारा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची चालणारी वाटचाल पाहता सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा पक्षप्रवेश करत आहे, असे त्यांनी म्हटले. पक्ष प्रवेशानंतर मला काही मिळावे, म्हणून मी पक्षात आलो नाही, असेही थोपटे म्हणाले.