राज्याचा निकाल ९१.८८ टक्के, कोकण विभाग अव्वल
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असल्याचे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे राज्यात बारावीचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे.
खासगी विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार १३३ इतकी होती, त्यापैकी ३५ हजार ६९७ जणांनी परीक्षा दिली. त्यात २९ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा दिलेल्या आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७३.७३ टक्के इतकी आहे तर पुर्नपरीक्षेला ४२ हजार २४ रिपीटर्स बसले होते. त्यापैकी १५ हजार ८२३ रिपीटर्स विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर्सची उत्तीर्ण टक्केवारी ३७.६५ टक्के इतकी आहे. तसेच ७ हजार २५८ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
लातूर विभागाची घसरण
९ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागल्याचे जाहीर केले तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूरमधून फक्त ८९.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच विज्ञान शाखा-९७.३५ टक्के, कला शाखा-८०.५२ टक्के, वाणिज्य शाखा-९२.६८ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम ८३.०३ टक्के आणि आयटीआयचे ८२.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदा एकही विद्यार्थ्याला
१०० टक्के गुण नाहीत
बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. राज्यातील १ हजार ९२९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. तसेच ९० ते ९९.९९ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ४ हजार ५६५ आहेत.
३८ कॉलेजचा शून्य टक्के निकाल
राज्यात १० हजार ४९६ कॉलेजमधून विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ३८ आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमी लागला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७% होता. यंदा ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या निकालात १.४९ टक्क्याने घसरण झाली आहे.
विभागीय निकाल
कोकण : ९६.७४
पुणे : ९१.३२
नागपूर : ९०.५२
छ. संभाजीनगर : ९२.२४
मुंबई : ९२.९३
कोल्हापूर : ९३.६४
अमरावती : ९१.४३
नाशिक : ९१.३१
लातूर : ८९.४६