वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी दि. २ एप्रिल २०२५ रोजी जागतिक स्तरावर जशास तसे आयातशुल्क धोरणाची घोषणा केली. त्यामुळे जागतिक अर्थकारणाला मोठे हादरे बसले आहेत. जगभरातील शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. याच्या भीषण झळा भारतासह जगाला बसत आहेत. युरोपीय महासंघ आणि ब्रिटनने याचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असल्याचे म्हटले आहे, तर चीनने अमेरिकी आयात उत्पादनावर जशास तसे ३४ टक्के आयात शुल्क आकारून अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हेकेखोरपणा जगाला नडण्याची चिन्हे असून यातून जागतिक व्यापार युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सत्तेत येताच ट्रम्प टॅरिफचा दणका देण्याचे ठरवले आणि इतर देशांसोबत जशास तसे आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आणि २ एप्रिल रोजी याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे भारतासह जगभरातील सर्वच देशांना आपापल्या देशांतील वस्तूंची अमेरिकेत निर्यात करताना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. ट्रम्प टॅरिफ अंतर्गत भारतावर अतिरिक्त २६ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. तसेच बांगला देशावर ३७, चीन-३४, व्हिएतनाम-४६ आणि थायलंडवर ३६ टक्के वाढीव आयात शुल्क आकारले. जगभरातील जवळपास ६० देशांवर हे आयातशुल्क आकारण्यात आले. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता वाढली आहे. चीन आणि कॅनडाने अमेरिकेला प्रत्युत्तर द्यायचे ठरवले. त्यातच चीनने अमेरिकेला जशास तसे उत्तर देत अमेरिकेतून चीनमध्ये येणा-या उत्पादनावर ३४ टक्के आयात शुल्क आकारून जशास तसे उत्तर दिले. यामुळे अस्थिरता वाढून जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाला नुकसान पोहोचेल, असे सांगण्यात येत आहे. त्याची प्रचिती ३ एप्रिलपासून येत असून, अमेरिका, भारतासह जगभरातील शेअर बाजार कोसळत असून, गुंतवणूकदारांचे रोज लाखो कोटी रुपये पाण्यात जात आहेत. यामुळे जागतिक मंदीचे संकटही कोसळण्याची भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अमेरिकेने सर्वात आधी चीन, कॅनडा आणि मॅक्सिकोवर आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २ एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेत निर्यात करणा-या प्रत्येक देशावर आयात शुल्क लादणार असल्याचे सांगितले. अमेरिकेने भारतावर २६ टक्के, युरोपियन युनियनवर २० टक्के परस्पर आयातशुल्क आकारले. त्यामुळे जगभरातून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, अमेरिकेने चीनवर ३४ टक्के आयातशुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चीननेही अमेरिकेवर पलटवार केला. अमेरिकेतून येणा-या वस्तूंवर ३४ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा चीनने केली. याशिवाय ११ कंपन्यांना बिनाभरवण्याचे उद्योग अशा यादीत टाकले. याद्वारे चीन या कंपन्यांना चीन किंवा चीनच्या कंपन्यांशी व्यवसाय करण्यापासून रोखत आहे. चीनने निर्णय घेताच ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे याचेही जागतिक स्तरावर पडसाद उमटण्याचीही शक्यता आहे. या माध्यमातून अमेरिकेने जागतिक व्यापार युद्ध सुरु केले आहे. आता चीन, यूरोपिय युनियन आणि इतर देशांकडून प्रत्युत्तर म्हणून टॅरिफ लावले जाऊ शकते. यामुळे अस्थिरता वाढून जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाला नुकसान पोहोचेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भारतीयांचे ९.५ लाख कोटी पाण्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादत असल्याची घोषणा केली. जागतिक बाजारातून कमजोर संकेत मिळाल्याने भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळाला. भारतीय शेअर बाजारात ३ एप्रिलला ट्रम्प टॅरिफचा फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र, ४ एप्रिलला शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे दिसून आला. गुंतवणूकदारांचे तब्बल साडेनऊ लाख कोटी रुपये बुडाले. अमेरिकेतही प्रथमच शेअर बाजारात मोठी घसरण होत असून, गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अमेरिकेत पुन्हा घसरण
जागतिक बाजारातून कमजोर संकेत मिळाल्याने अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये २०२० नंतरची मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील घसरणीमुळे २.५ ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य घटले. याचा परिणाम आशियाई बाजारात दिसून आला.
चीनची निर्यातबंदी
अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी चीनने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेला निर्यात केल्या जाणा-या सात दुर्मिळ आणि हेवी मेटॅलिक एलिमेंटसच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय चीनने घेतला. त्यामुळे अमेरिकेला हा मोठा धक्का असणार आहे.
अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांच्या मते
मंदीची शक्यता वाढली
ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणानंतर आता अमेरिकेतील आघाडीच्या बँकांनी आर्थिक मंदीचा इशारा दिला आहे .जे पी मॉर्गनचे अर्थतज्ञ ब्रूस कासमन यांनी २०२५ मध्ये जागतिक मंदीची शक्यता ६० टक्क्यांनी वाढली आहे. ही शक्यता आधी ४० टक्क्यांवर होती. जशास तशा करवाढीमुळे अमेरिकन व्यवसायिकांमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो. पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होऊ शकतात. गोल्डमन्स सॅक्सने येत्या बारा महिन्यात इतर देशांचे कर १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज वर्तवत जागतिक मंदीची शक्यता २० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. तसेच अमेरिकेत बेरोजगारी ४.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असे भाकितही करण्यात आले. अमेरिकी टेरिफ धोरणामुळे ग्राहक आणि उद्योगांमध्ये प्रचंड निराशा वाढल्याचे गोल्डमन सॅक्स यांच्या अहवालात म्हटले आहे .
अमेरिकेला मिळणार
६०० अब्ज डॉलर?
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने करवाढीमुळे अमेरिकेला दरवर्षी सहाशे अब्ज डॉलरचा महसूल मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यावर अनेक आघाडीचे अर्थशास्त्रज्ञ शंका व्यक्त करत आहेत .