इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा, एजबॅस्टन मैदानावर भारताचा पहिला विजय
बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था
भारताच्या यंग ब्रिगेडने दुस-या कसोटी सामन्यात इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाने ५८ वर्षांत बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर पहिला विजय मिळविला. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा अनोखा विक्रम नोंदवला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी धुव्वा उडवित परदेशातील सर्वांत मोठा विजय मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. एवढेच नाही तर भारत या मैदानात कसोटी जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने ४३० धावा केल्या. आकाश दीपने १० विकेटस् घेण्याचा विक्रम केला तर मोहमद सिराजने ७ विकेटस् घेतल्या.
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने द्विशतकासह भारताच्या विजयाचा पाया रचला होता. भारताच्या गोलंदाजांनी त्यावर कळस चढवला आणि इंग्लंडला २७१ रन्सवर ऑलआऊट करीत ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वातील भारताचा हा पहिला विजय ठरला. तसेच बर्मिंगहॅममध्ये कसोटी विजय मिळवून देणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. याआधी कपिल देव, सुनील गावसकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि अनेक दिग्गज कर्णधारांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. परंतु बर्मिंगहॅममध्ये आतापर्यंत एकाही कर्णधाराला विजय मिळवून देता आला नाही. ते शुभमनने करून दाखविले.
शुभमन गिलने या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले तर दुस-या डावात शतक पूर्ण केले. शुभमनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने इंग्लंडची चौथ्या दिवशी ३ बाद ७८ अशी अवस्था केली होती. त्यामुळे पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ७ विकेट्सची गरज होती. पण पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सामना वेळेत सुरु झाला नाही. पण पावसानंतर भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले.
आकाश दीपने इंग्लंडला एकामागून एक दोन धक्के दिले. त्याने प्रथम ऑली पोपला २४ धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर विजयाच्या मार्गात अडसर ठरत असलेल्या हॅरी ब्रुक्सला बाद केले. आकाशच्या चेंडूचा वेग इतका होता की, आपण बाद झालो, हे हॅरीला समजलेच नाही. त्यांनतर बेन स्टोक्सचा अडसर वॉशिंग्टन सुंदरने दूर केला. यावेळी जेमी स्मिथ भारताच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा होता. पण आकाश दीपने त्याला ८८ धावांवर बाद केले आणि तिथेच भारतीय संघाचा विजय निश्चित झाला. त्यानंतर एकामागोमाग विकेट पडल्याने भारताने एजबेस्टनवर तिरंगा फडकवला.
५८ वर्षांनंतर एजबॅस्टनवर
टीम इंडियाने रचला इतिहास
बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात भारतीय संघाने १९६७ ते २०२२ या कालावधीत ८ कसोटी सामने खेळले होते. यात १९८६ मध्ये एक सामना अनिर्णित राहिला आणि इतर ७ सामन्यांत भारतीय संघाच्या पदरी पराभव पडला. अखेर तब्बल ५७ वर्षांनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एजबॅस्टनच्या मैदानात विजयी पताका फडकावली. शुभमन गिलसाठी हा क्षण खास आहे. कारण जे भल्या-भल्याला जमले नाही, ते गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला विजय नोंदवत इतिहास रचला.
दुस-या डावात आकाश दीपचा पंच
डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना आकाश दीप आणि मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर आघाडी फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुस-या डावात या जलदगती गोलंदाजांनी वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा आणि रवींद्र जडेजा या जोडीनेही उत्तम साथ दिली आणि बर्मिंगहॅमचे मैदान मारले. आकाश दीपला बुमराहच्या जागी संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करीत पहिल्या डावात ४ आणि दुस-या डावात ६ अशा एकूण १० विकेटस घेत चेतन शर्मानंतर इंग्लंडमध्ये १० विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला.