पैशासाठी साडेपाच तास उपचार केला नाही
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रूग्णालय जबाबादार आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. यावेळी रूग्णालयाने रूग्णाची खासगी माहिती अहवालातून दिल्याने चाकणकरांनी निषेध व्यक्त केला आणि याबाबत त्यांनी दीनानाथ रूग्णालयाला समज देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. साडेपाच तासात रूग्णालयाने तनिषा भिसे यांच्यावर कोणतीही उपचार केले नाहीत, असा ठपकाही त्यांनी ठेवला.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केवळ पैशाच्या कारणामुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रुग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर रुग्णालयानेदेखील एक चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला, त्यानंतर आज शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात आली. दरम्यान भिसे कुटुंबीयांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी एक लेखी पत्र देखील दिले आहे. आज यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी दीनानाथ रूग्णालयावरती ठपका ठेवण्यात आला.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी तनिषा भिसे यांच्या आजाराबाबतच्या गोपनीय गोष्टी सार्वजनिक केल्या. रुग्ण आणि नातेवाईक २८ मार्चला नऊ वाजता रुग्णालयात गेल्यावर दहा लाख रुपयांची मागणी केली. अडीच वाजता रुग्ण मंगेशकर रुग्णालयातून बाहेर पडला. साडेपाच तासात रूग्णालयाने तनिषा भिसे यांच्यावर कोणतीही उपचार केले नाहीत. उलट त्यांना त्यांच्याजवळ असलेली गोळी घेण्याचा सल्ला दिला होता. रूग्णांच्या नातेवाईकांचा दावा आहे की, मंगेशकर रुग्णालयाने आमच्यावर उपचार करायला तयार असल्याचे सांगितले.
गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबतचा अंतिम अहवाल माता मृत्यू अन्वेशन विभागाकडून सादर होईल तर आणखी एक अहवाल धर्मादायक विभागाकडून सादर होईल. तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहिल्यावर कारवाई काय करायचे हे ठरेल, पेशंटला योग्य उपचार मिळाले नाहीत असा शासनाचा अहवाल आल्याचे त्यांनी म्हटले आहे. साडेपाच तास गर्भवती महिला ही रुग्णालयातच होती. त्या तासाच रुग्णालयाने योग्य ते उपचार केले नाहीत. त्वरित उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता. पण मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही नियमावली पाळली नाही. त्यामुळे रुग्णालयावर कायदेशीर कारवाई होणार असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.
वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता
शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी झालेली असताना मात्र, पैसे वेळेत भरु न शकल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे रूग्णालयावरची ठपका ठेवण्यात आला आहे. तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता, रक्तस्त्राव सुरूच होता, रुग्णाचे मानसिक खच्चीकरण झाले, रूग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणे आवश्यक होते, त्यांनी उपचार करणे गरजेचे होते, पण त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती चाकणकरांनी दिली. वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता, असेही त्या म्हणाल्या.