कामगिरीचा सन्मान
मुंबई : प्रतिनिधी
रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत प्रामुख्याने घेतले जाते. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं टी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली आहे तर वनडे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. रोहित शर्माच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचे नाव दिले जाणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रोहित शर्मासोबत शरद पवार आणि अजित वाडेकर यांचे नावदेखील देण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रँड स्टँड लेवल ३ स्टँडला शरद पवार यांचे नाव दिले जाईल तर ग्रँड स्टँड लेवल ४ ला अजित वाडेकर यांचे नाव दिले जाईल. दिवेचा पॅवेलियन लेवल ३ रोहित शर्माचे नाव दिले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मिलिंद नार्वेकर यांनी मांडला तर जितेंद्र आव्हाड यांनी त्याला अनुमोदन दिले.