मुंबई : प्रतिनिधी
विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जाणारे हजारो वारकरी शेकडो मैल अंतर कापत पंढरपुरात येतात . काट्या-कुट्यातून मजल-दरमजल करीत २५० किमीचा प्रवास करून पंढरीच्या वारीला जातात. यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वारीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे .यासंदर्भात महसूल विभागाने मंगळवार, दि. १ जुलै रोजी परिपत्रक जारी केले.
या निर्णयामुळे वारीदरम्यान घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे. १६ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत वारीदरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम मिळणार आहे. मात्र आत्महत्येच्या घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही. याशिवाय, वारीदरम्यान अपघातामुळे अपंगत्व आल्यासदेखील आर्थिक मदतीची तरतूद आहे.
अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांस ४ लाखांची मदत देण्यात येणार आहे. वारीदरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार, ६० टक्क्यांवरून अधिक अपंगत्व आल्यास २.५० लाख, एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पीतळात दाखल झाल्यास १६००० रुपये तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास ५४०० रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
या घटनांमध्ये मिळू शकते मदत
शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरता वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १६ जून ते १० जुलैदरम्यान अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदतीची तरतूद करण्यात आली आहे . आत्महत्या, विषबाधा, खून वगळून इतर नैसर्गिक मृत्यू अपघाताने झालेल्या दुर्घटनांमध्ये ही आर्थिक मदत दिली जाईल .