थेट अर्थव्यवस्थेलाच सुरुंग
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आधी पाणी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता थेट अर्थव्यवस्थेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला असून, त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून भारतात आयात होणा-या सर्व वस्तूंवर भारताने बंदी घातली आहे. तसेच निर्यातही बंद केली आहे. यासंबंधी वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तानसोबत आयात-निर्यात पूर्णपणे बंद केल्याने आता पाकिस्तानातील कोणतीही वस्तू भारतात मिळणार नाही. पाकिस्तानसोबतचे आर्थिक संबंध पूर्णपणे तोडण्याच्या दिशेने भारत सरकारकडून पावले टाकली जात असून, या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. भारत सरकारने कुरिअर सेवेवरही बंदी आणली आहे. पाकिस्तानमधून हवाई व भूपृष्ठ मार्गाने येणा-या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची देवाणघेवार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे भक्कम पुरावे तपास संस्थांना मिळाले आहेत. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्यात सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यासह इतर अनेक निर्णय घेतले गेले. तसेच केंद्र सरकारने लष्कराला पाकिस्तानवरील कारवाईबाबत पूर्ण सूट दिली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी पाकिस्तानसोबतच आयात-निर्यात पूर्णत: बंद केली आहे. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानचे कोणतेही साहित्य भारतात येणार नाही. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणतीही वस्तू भारतात येणार नाही.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २ मे रोजी अधिसूचना जारी केली असू,न त्यात पाकिस्तानसंदर्भात आयात-निर्यातीवरील बंदीचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतला गेल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये निर्मिती झालेली वस्तू सरळ किंवा तिस-या देशांच्या माध्यमातून भारतात आयात होणार नाहीत. भारत सरकारने लादलेले हे निर्बंध २०२३ च्या परराष्ट्र व्यापार धोरणातील नवीन तरतुदीनुसार घेतले गेले.
पाक जहाजांच्या
प्रवेशावर बंदी
भारताने आज भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घातली. तसेच भारतीय जहाजांनाही पाकिस्तानी बंदराने भेट देण्यासही बंदी घातली. भारतीय मालमत्ता, मालवाहू आणि जोडलेल्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता, सार्वजनिक हितासाठी पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ड्रायफ्रूट, टरबूज, सेंधा
मिठाची केली जाते आयात
पाकिस्तान भारताला ड्रॉयफ्रूट, टरबूज, सिमेंट, सेंधा मीठ आयात करते तर भारताकडून पाकिस्तानला दगड, चुनखडी, चष्म्यासाठी ऑप्टिकल वस्तू, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने, धातू संयुगे आणि चामड्याच्या वस्तू निर्यात केल्या जातात. परंतु आता आयात आणि निर्यातही बंद केल्याने आता पाकिस्तानची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.