अत्याधुनिक खेबर शिकनचा वापर, १४ शहरांतील इमारती उद्ध्वस्त
जेरुसलेम : वृत्तसंस्था
आज इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा १० वा दिवस होता. आता अमेरिकाही या युद्धात सामील झाली आहे. अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या ३ अणुप्रकल्पांवर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलच्या १४ शहरांवर ४० क्षेपणास्त्रे डागली. इराणने आता माघार घेणार नसल्याचे सांगत थेट इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले वाढविले असून, तब्बल १४ शहरांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे या सर्वच शहरांत ब-याच इमारती बेचिराख झाल्या असून, गेल्या १० दिवसांतील हा सर्वांत मोठा हल्ला होता. या हल्ल्यात सर्वांत अत्याधुनिक असलेल्या खेबर शिकन क्षेपणास्त्राचा पहिल्यांदाच वापर केला.
इराणी क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हैफा आणि तेल अवीवमधील लष्करी आणि निवासी तळांवर पडली. यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. जवळपास १४ शहरांमधील बराच भाग अक्षरश: बेचिराख झाला. त्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळावरून मुले, महिला आणि अनेक पाळीव प्राण्यांना वाचवले. या हल्ल्यात हैफा आणि तेल अवीवमधील लष्करी आणि निवासी तळांवर इराणी क्षेपणास्त्रांनी मोठा विनाश केला. रविवारी इस्रायलवरील सर्वांत मोठा हल्ला होता. त्यामुळे अनेक निवासी इमारती ढासळल्या.
खैबर बॅलिस्टिक मिसाइल इराणच्या संरक्षणासाठी खूप महत्त्वाची आहे. आज इराणने पहिल्यांदाच खैबर मिसाइलचा वापर केला. खैबर मिसाइल हे इराणचे सर्वात आधुनिक बॅलिस्टिक मिसाइल आहे. त्याची मारक क्षमता २ हजार कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एयर डिफेन्स सिस्टमला रोखणे अशक्य आहे. इराणने आतापर्यंत गदर आणि इमादचा वापर केला. त्यानंतर खतरनाक खोरमशहर क्षेपणास्त्रही वापरले जाऊ शकते.