अमेरिकेने चीनवर १०४ टक्के कर
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेने जशास तसा कर लादण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून सर्वच देशांविरोधात त्यांच्या करानुसार आयात कर लागू केला. त्यानुसार अमेरिकेने चीनविरोधात थेट ३४ टक्के कर वाढविला, त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेतून चीनमध्ये येणा-या वस्तूंवर ३४ टक्के लावत जशास तसे उत्तर दिले. त्यानंतर आता अमेरिकेनेही त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले असून, आता थेट १०४ टक्के कर लादल्याने अमेरिका, चीनमध्ये आता व्यापार युद्ध सुरू झाले आहे. याचे पडसाद जगभर उमटण्याची चिन्हे आहेत. आयात करात ट्रम्प यांनी मनमानी सुरू केल्याने जगभरातील अनेक देश नाराज आहेत. त्यातल्या त्यात युरोपीयन देशांनी तर याला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे आगामी काळात व्यापार युद्ध अधिक प्रमाणात ताणले जाऊ शकते, याचा फटका जगातील आर्थिक व्यवहारावर होऊ शकतो.
चीनने अमेरिकेवर लादलेला ३४ टक्के कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त ५० टक्के कर लादला जाईल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. ती धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी खरी करून दाखवत चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १०४ टक्के कर लादण्याचा निर्णय जाहीर केला. अमेरिका आमच्यावर लादत असलेले शुल्क आणखी वाढवण्याची धमकी देऊन एकामागून एक चुका करत आहे. जर व्यापार युद्ध झाले तर चीन पूर्णपणे तयार आहे, असे चीनने स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांच्या करवाढीस जशास तसे प्रत्युत्तर देत चीनने कर लादल्याने व्यापार युद्ध भडकले आहे. त्यातच चीनने ही करवाढ मागे न घेतल्यास त्यांच्यावर आणखी ५० टक्के कर लादू, असा इशारा ट्रम्प यांनी सोमवारी दिला होता. चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशा-याचा निषेध करत हे अतिरिक्त ५० टक्के शुल्क म्हणजे ब्लॅकमेल असल्याचे म्हटले होते. जर दोन्ही देशांनी यावर तोडगा काढला नाही आणि ट्रम्प त्यांच्या योजनांना चिकटून राहिले तर या वर्षी अमेरिकेत आयात केलेल्या चिनी वस्तूंवर एकूण नवीन शुल्क १०४ टक्क्यांवर जाऊ शकते, असे सांगण्यात आले होते. यामुळे व्यापार युद्ध वाढू शकते, ज्यामुळे महामारीनंतर आधीच सर्वात जास्त झालेल्या नुकसानात भर पडण्याची शक्यता होती. अखेर ट्रम्प सरकारने चीनवर १०४ टक्के आयात कर लादला.
चीनने अमेरिकेवर ३४ टक्के प्रत्युत्तरात्मक कर लादल्यानंतर अवघ्या ४८ तासांत ट्रम्प यांनी ५० टक्के कर लादण्याचे हे विधान केले होते. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्के शुल्क लादले होते. जे चीनने तात्काळ मागे घेत प्रत्युत्तर म्हणून तेच शुल्क अमेरिकेवर लादले. आता ट्रम्प यांनी त्यात आणखी ५० टक्के वाढ केली. त्यामुळे चीनवरील अमेरिकेचे एकूण शुल्क ८४ टक्क्यांवर गेले. या व्यतिरिक्त ट्रम्प प्रशासनाने आधीच लागू असलेल्या २० टक्के जागतिक शुल्काची भर घातली. त्यामुळे एकूणच चिनी वस्तूंवर १०४ टक्के शुल्क लागू झाले.
युरोपियन कमिशनही ट्रम्प यांना टक्कर देणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ज्या प्रकारे टॅरिफ वॉर सुरू केले आहे, आता अशा स्थितीत काही देशांनी ट्रम्प यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. चीनने यापूर्वीच अमेरिकेला या प्रकरणात आरसा दाखवला असून आता २७ देशांचा संपूर्ण गट म्हणजेच युरोपियन कमिशनही ट्रम्प यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. १६ मेपासून काही वस्तूंवरील शुल्क लागू होईल, असे एजन्सीने सांगितले.