वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत होणारा एका मोठा दहशतवादी हल्ला थोडक्यात टळला आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) वेळेत हस्तक्षेप करून इसिसची मोठ्या हल्ल्याची योजना हाणून पाडली आहे. हा हल्ला मिशिगनमधील अमेरिकन सैन्याच्या तळावर केला जाणार होता. एफबीआयच्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्याची योजना आखण्यात आली होती. एफबीआयच्या गुप्तचर विभागाने आणि गुप्त अधिका-यांनी एकत्रितपणे या दहशतवादी हल्ल्याच्या योजनेचा पर्दाफाश केला.
एफबीआयचे सहाय्यक संचालक काश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला मिशिगनच्या वॉरेन शहरात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या तळावर आणि टँक-ऑटोमोटिव्ह अॅण्ड आर्मामेंटस् कमांड या लष्करी तळावर केला जाणार होता. अम्मार अब्दुल माजिद-मोहम्मद सईद हा या कटामागील मूळ आरोपी होता. तो इसिसच्या सांगण्यावरून काम करत होता. सईदचा मुख्य उद्देश अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करणे आणि मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करणे, असा होता. मात्र, एफबीआयने हा कट उधळून लावला.
एफबीआयनुसार, सईद एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत होता. त्याने हल्ला करण्यापूर्वी त्या ठिकाणाची सर्व माहितीही गोळा केली होती. मात्र, या दरम्यान एफबीआयच्या गुप्त अधिका-यांना त्याच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्यावर गुप्त पाळत ठेवण्यात आली. यानंतर पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर विदेशी दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणे आणि षड्यंत्र रचणे यांसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.