पुरी : वृत्तसंस्था
हिंदू धर्मामधील चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी ओडिशामधील जगन्नाथ मंदिर एक आहे. मंदिरामध्ये श्री जगन्नाथ (भगवान श्रीकृष्ण), श्री बलभद्र (बलराम) आणि देवी सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा देशात नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो भाविक या यात्रेसाठी जगन्नाथ पुरीत दाखल होत असतात. ही यात्रा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितीयाला सुरु होते. यंदा २७ जूनपासून यात्रेस सुरुवात झाली. भगवान जगन्नाथ यांच्या या यात्रेला ऐतिहासिक अन् पौराणिक महत्व आहे.
तीन विशाल रथातून श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथयात्रा निघते. गंडिचा मंदिरापर्यंत हे रथ ओढले जातात. त्या ठिकाणी एक आठवड्यापर्यंत भगवान वास्तव्य करतात. त्यानंतर पुन्हा मंदिरात परत येतात. एकूण ९ दिवस चालणारा हा उत्सव असतो. आस्था, श्रद्धा आणि भक्तीचा हा पुण्यपर्व आहे. या उत्सवात भगवान आपल्या भक्तांबरोबर असतात. त्यावेळी कोणी राजा नसतो, कोणी रंक नसतो. यात्रेच्या इतिहासात पुरीचे राजा ज्यांना गजपती म्हटले जाते, ते साधे कपडे परिधान करुन येत असतात. त्यांच्या हातात सोन्याची मूठ असणारे झाडू असतो. त्या झाडूने ते रथमार्ग स्वच्छ करतात.
भगवान जगन्नाथ यांचा रथ सर्वात मोठा असतो. हा रथ ४५ फूट उंच आणि ३५ फूट लांब असतो. हा रथ पिवळ्या आणि लाल रंगाने सजवण्यात येतो. या रथाला नंदीघोष म्हणतात. त्याच्या निर्मितीसाठी जवळपास दोन महिने लागतात. बलभद्रजी यांचा रथ ४४ फूट आणि देवी सुभद्रा यांचा रथ ४३ फूट उंच असतो. भगवान जगन्नाथजी यांच्या रथाला १६ चाके असतात. ८३२ लाकडांचे तुकडे त्यासाठी वापरले जातात. रथावरील सारथीचे नाव दारुक आहे. रक्षक गरुण आहे. रथाची दोरी शंखचूर्ण नागुणी आहे. त्रैलोक्य मोहिनीचा ध्वज रथावर फडकतो. हा रथ ओढणाऱ्या चार घोड्यांची नावे शंख, बहलक, सुवेत आणि हरिदास्व अशी आहेत. भगवान जगन्नाथ यांच्या रथावर नऊ देवतादेखील स्वार होतात. भगवान जगन्नाथ यांच्या रथाचा रंग लाल-पिवळा, बलराम यांच्या रथाचा रंग लाल-हिरवा असतो.
बलभद्रजी यांच्या रथाला तालध्वजा किंवा लंगलध्वजा म्हटले जाते. या रथाला १४ चाके असतात. हा रथ बनवण्यासाठी ७६३ लाकडे वापरली जातात. रथवरील सारथीचे नाव माताली आहे. रक्षकाचे नाव वासुदेव आहे. दोरीचे नाव वासुकी नाग आहे. ध्वजाचे नाव उन्नानी आहे. रथामध्ये चार घोडे आहेत ज्यांची नावे तीवरा, घोर, दीर्घाश्रम, स्वर्ण नाभ आहेत. देवी सुभद्रा यांच्या रथला दर्पदलन म्हणतात. या रथाला १२ चाके असतात. देवी सुभद्रा यांचा रथाचा रंग लाल-काळा असतो. देवी सुभद्राचा रथ ओढणाऱ्या चार घोड्यांची नावे रुचिका, मोचिका, जीत आणि अपराजिता आहेत. अर्जुन स्वतः या रथाचा सारथी आहे. रथाची रक्षक जयदुर्गा देवी आहे. रथाला बांधलेल्या दोरीचे नाव स्वर्णचूड नागुनी आहे . या रथाच्या ध्वजाला नादंबिका असे म्हणतात.
रथयात्रेचा इतिहास
जगन्नाथ पुरीचा रथ यात्रेचा इतिहास जवळपास एक हजार वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. बाराव्या शतकात गंगवंशचे राजा अनंतवर्मन चोडगंगदेव यांनी मंदिराचे निर्मिती केली होती. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. मंदिराच्या निर्मितीच्या पूर्वीपासून रथयात्रेच्या इतिहास आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर या यात्रेला भव्य स्वरुप आले. रथयात्रेचा उल्लेख श्रीमद्भागवत स्कंद पुराण, ब्रह्म पुराण यांच्यातही आहे. मंदिराच्या सिंह द्वारवरुन भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा सुरु होते. भगवान जगन्नाथ, बलभद्रजी आणि देवी सुभद्रा या रथांमधून त्यांच्या मावशीच्या घरी गुंडिचा मंदिरात जातात. हे रथ दरवर्षी नवे बनवले जातात.