अखेर मुंबई महापालिकेची माघार
मुंबई : विलेपार्ले (पूर्व) येथील २७ वर्षे जुने श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्यामुळे संपूर्ण जैन समाज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरल्यानंतर अखेर मुंबई महापालिकेने त्याचठिकाणी पुन्हा मंदिर बांधण्याची परवानगी दिली आहे.
जैन मंदिर पाडल्याच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विलेपार्ले (पूर्व) येथे शनिवारी संपूर्ण जैन समाज रस्त्यावर उतरला होता. सुमारे १० हजार भाविकांनी एकत्र येऊन अहिंसा रॅली काढली. या रॅलीतील लोकांनी अंधेरी (पूर्व) येथील सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालयावर धडक देऊन शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला. काँग्रेसच्या स्थानिक खासदार वर्षा गायकवाड आणि भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी रॅलीत सहभागी होऊन जैन समाजाला पाठिंबा दिला.
मंदिर पाडल्यामुळे जैन समाजात निर्माण झालेला प्रचंड रोष लक्षात घेऊन अखेर महापालिका प्रशासनाने माघार घेतली. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी २७ वर्षे जुने श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर त्याचठिकाणी पुन्हा बांधण्यास संमती दिली आहे. मंदिर पाडल्याप्रकरणी सहायक महापालिका आयुक्त नवनाथ घाडगे पाटील यांची के-पूर्व प्रभागातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्वप्नंज क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जैन मंदिर पाडल्यावर रस्त्यावर उतरलेल्या जैन समाजाने मंदिराचा मलबा काढून त्याचठिकाणी पूजा करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, सहाय्यक महापालिका आयुक्तांनी ती नाकारल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, आता जैन मंदिर पुन्हा बांधले जाईल. पर्यायी व्यवस्था म्हणून अभिषेक व पूजा टीनच्या शेडमध्ये केली जाणार असल्याची माहिती दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने दिली.