यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक कामगिरी
लंडन : वृत्तसंस्था
भारताच्या यशस्वी जयस्वालने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले आणि इतिहास रचला. आतापर्यंत जे कोणत्याही खेळाडूला जमले नाही, ते यशस्वीने इंग्लंडच्या दौ-यातील पहिल्याच सामन्यात करून दाखवले. त्याने १४४ चेंडूत शतक झळकावले. दरम्यान, शुभमन गिलनेही कर्णधार होताच पहिल्याच सामन्यात शतक झळकावत इतिहास रचला. गिलने या संधीचे सोने केले आणि कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सामन्याच्या दुस-या दिवशी यष्टिरक्षक ऋषभ पंतने शतक झळकावत माजी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडित काढला.
यशस्वीने भारताला चौकारानिशी दमदार सुरुवात करून दिली. पहिला तास भारतासाठी महत्वाचा होता. कारण त्यावेळी गोलंदाजांसाठी पोषक वातावरण होते. पण यशस्वीने या गोष्टीची तमा बाळगली नाही. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासून हल्ला चढवला आणि बाकीच्या फलंदाजांवरचे दडपण त्याने कमी केले. यशस्वीने पहिल्या तासातच भारताला चांगली धावसंख्या रचून दिली आणि केएल राहुलबरोबर त्याने ९१ धावांची भागीदारी रचली. राहुल बाद झाला, साई सुदर्शन बाद झाला, पण यशस्वी खेळपट्टीवर ठामपणे उभा राहिला आणि त्याने आता शतकासह इतिहास रचला. दरम्यान, यशस्वीनंतर कर्णधार शुभमन गिलनेही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जोरदार फटकेबाजी करीत शानदार शतक झळकावले. यशस्वीनंतर ऋषभ पंतची त्याला चांगली साथ मिळाली.
ऋषभ पंतचेही शतक
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात सलामीवीर तेजस्वी जयस्वाल, कर्णधार शुभमन गिल यांनी पहिल्या दिवशी शतक झळकावले. त्या पाठोपाठ दुस-या दिवशी ऋषभ पंतने शानदार शतक केले. ऋषभचे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७ वे आणि इंग्लंडविरुद्ध चौथे शतक ठरले. त्याने इंग्लंडच्या भूमीवर तिसरे शतक झळकावले. पंत आता भारतासाठी सर्वाधिक शतके ७ करणारा विकेटकीपर फलंदाज बनला. त्याने महेंद्रसिंग धोनीचा (६ शतके) विक्रम मोडला. वृद्धीमान साहा (३ शतके) तिस-या स्थानावर आहे. त्याने १४६ चेंडूत शतक पूर्ण केले. ९९ धावांवर असताना त्याने षटकार ठोकून शतक पूर्ण केले.