२५ मे रोजी पुण्यात पत्रकारांचा होणार गौरव
मुंबई : प्रतिनिधी
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणा-या पत्रकारांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने गौरव करण्यात येतो. २०२५ चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून, दि. २५ मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुणे येथील जेडब्ल्यू मेरिओट हॉटेल येथे रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात येणार आहे.
यंदाच्या पुरस्काराची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली असून, एबीपी माझा मुंबईच्या संपादिका सरिता कौशिक, छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, कोल्हापूर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबईचे अध्यक्ष दिलीप सपाटे हे यंदाच्या महागौरव पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यासोबतच डिजिटल मीडियात उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकारांचा डिजिटल स्टार पत्रकारिता महागौरव पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यामध्ये लोकमत डिजिटलच्या अश्विनी जाधव-केदारी, महाराष्ट्र टाईम्स डिजिटलचे अभिजित दराडे, लेटस्अप डिजिटलचे विष्णू सानप आणि मुंबई तक डिजिटलचे ओमकार वाबळे हे यंदाच्या डिजिटल पत्रकारिता क्षेत्रातील महागौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.