जैशचे मुख्यालयही नष्ट, अनेक दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू : भारतीय लष्कराकडून १५ दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. अवघ्या २३ मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून आॅपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये जैश-ए-मोहमद आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या २ टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला. यानंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताच्या हल्ल्याचा बदला घेण्याचा आदेश पाकिस्तानी लष्कराला दिला आहे.
मुरिदकेच्या मरकझ तोयबा मशिदीवरील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार झाल्याची माहिती मिळत आहे. फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी आॅपरेशन सिंदूरद्वारे जबरदस्त कामगिरी केली. स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. आॅपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे हेडकॉर्टर उद्ध्वस्त केले. यासोबतच मुरीदकेमधील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय होते, तेही उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
भारताने केलेल्या हल्ल्यावेळी बहावलपूरमध्ये २०० हून अधिक दहशतवादी होते, अशी माहिती मिळत आहे तर मुरिदकेमध्ये १२० हून अधिक दहशतवादी, मुजफ्फराबादमध्ये ११० ते १३० दहशतवादी, कोटलीमध्ये ७५ ते ८० दहशतवादी, सियालकोटमध्ये ९० ते १०० दहशतवादी, गुलपूरमध्ये ७५ ते ८० दहशतवादी, भिंबरमध्ये ६० हून अधिक दहशतवादी, चाक अम्रूमध्ये ७० ते ८० दहशतवादी होते, अशी माहिती सांगितली जात आहे.
दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचे अचूक लक्ष्य साधले आहे.
मसूद अजहरच्या
कुटुंबातील १४ ठार
आॅपरेशन सिंदूरच्या या एअरस्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूर अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा झाला. इतरही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत. यात मसूद अजहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता मसूदला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे.