दर १२ दिवसांनी पृथ्वीचे स्कॅनिंग, भूकंप, त्सुनामीआधीच मिळणार माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज एक ऐतिहासिक लॉंचिंग केली असून, भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीत तयार झालेले निसार सॅटेलाईट ५.४० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. या सॅटेलाईटला पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर म्हणून ओळखले जाते. हा उपग्रह आता नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देऊ शकणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा आपत्तीपासून अलर्ट होता येणार आहे.
निसार लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट आहे. जे नासा आणि इस्रोने संयुक्तपणे बनवले आहे. हे पृथ्वीचा पृष्ठभाग, बर्फ आणि जंगलांचे स्कॅनिंग करणार आहे. त्यासाठीच हे डिझाईन केले आहे. याला पृथ्वीचा एमआरआय स्कॅनह असे म्हटले जाते. याचे कारण हा सॅटलाईट पृथ्वीच्या पृष्ठभागाचे अतिशय बारीक फोटो काढू शकतो, ज्याद्वारे पृथ्वीवर होणारे छोटे बदलही पाहता येणार आहेत.
निसार उपग्रह हा मानवी कौशल्यांची देवाणघेवाण आणि तांत्रिक सहकार्याचा परिणाम आहे. जो दोन्ही अंतराळ संस्थांमध्ये एक दशकाहून अधिक काळ सुरू होता. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसार पृथ्वीवर संकट येण्याआधीच माहिती देणार आहे. निसार उपग्रह दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे स्कॅनिंग करणार असून, भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून सावध राहण्यास मदत करणार आहे.
१३ हजार कोटी रुपयांचा खर्च
१३ हजार कोटी रुपयांची (१.५ अब्ज डॉलर्स) मोहीम असून इस्रोचे ७८८ कोटी रुपयांचे योगदान आहे. त्याचा डेटा जगभरातील शास्त्रज्ञ, सरकार आणि सर्वसामान्य जनतेला मोफत उपलब्ध होणार आहे.