वाढवणा बंदर समृद्धी महामार्गाला जोडणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवार, दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविण्यता धोरण २०२५ ला मंजुरी देण्यात आली. या निर्णयासह अनेक निर्णय घेण्यात आले असून वाढवण बंदर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणा-या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करता येणार आहे, कॅबिनेट बैठकीत याबाबतच्या सुधारित धोरणास मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ सह एकूण ७ निर्णय घेण्यात आले. यामध्ये नागपूर, जळगाव जिल्ह्यातील २ महत्त्वाचे निर्णय आहेत. तसेच कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी सस्थांच्या अनुदानात वाढ, अनुदान २ हजारांवरून ६ हजार करण्यास मान्यता देण्यात आली. कौशल्य व रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रिमंडळातील निर्णयाबाबत माहित दिली. त्यानुसार महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ ला मान्यता देण्यात आली. त्यानुसार स्वयंरोजगारासाठी ५ ते १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज ३ टक्के व्याजदराने दिले जाईल. आयटीआय किंवा कोणीही ग्रॅज्युएट याचा लाभ घेऊ शकतील. सुरुवातीला ५ लाख विद्यार्थ्यांची निवड केली जाईल, त्यात मुले व मुलींनाही कर्ज देऊ, असे लोढा यांनी सांगितले. यासोबतच केंद्राच्या स्टार्टअप योजनेचा लाभ देण्यासाठीही आपण मदत करू, असेही लोढा यांनी सांगितले.
मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णय
-महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ जाहीर
-वाढवण बंदर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग जोडणा-या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी
-छोट्या, चिंचोळ््या आकाराच्या बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लॅण्ड लॉक्ड स्वरुपातील भूखंडांच्या वितरण धोरणास मंजुरी
-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर. सुधारित धोरणास मंजुरी.
-कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी सस्थांच्या अनुदानात २ हजारांवरून ६ हजार करण्यास मान्यता