ऑपरेशन सिंदूरनंतर अफगाणिस्तानात लपल्याची माहिती
कराची : वृत्तसंस्था
भारताविरुद्ध कट रचणारा पाकस्थित जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आज आपला भाऊ मौलाना तल्हा आसिफ याला घेऊन अफगानिस्तानात लपला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऑपरेशन सिंदूर. भारताकडून दहशतवादाविरुद्ध चालवलेल्या या जोरदार प्रत्युत्तर मोहिमेने दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. गुप्तचर सूत्रांनुसार मसूद अजहरला भीती आहे की भारतीय यंत्रणा पुन्हा एकदा दहशतवादी ठिकाणांवर मोठा हल्ला करू शकतात. अशा परिस्थितीत तो आपल्या मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांप्रमाणे सिंदूरच्या आगीत जळू नये याची काळजी घेत आहे.
अजहर सध्या अफगानिस्तानच्या खोस्त प्रांतातील गुरबुज जिल्ह्यात लश्कर-ए-तोयबाच्या एका प्रशिक्षण शिबिरात लपला असल्याचे सांगितले जात आहे. हृदयाच्या गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या अजहरला कराचीला यावे-जावे लागते, जिथून तो गुपचूप औषधे घेतो. त्याची प्रकृती इतकी खराब आहे की, डॉक्टरांनी त्याला बोलण्यासही मनाई केली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये अजहरच्या कुटुंबातील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्याने आपला धाकटा भाऊ मौलाना तल्हाला अफगानिस्तानात नेले आहे आणि त्याला दहशतवादी शिबिरांची जबाबदारी सोपवली आहे. पाकिस्तानला चांगलेच माहित आहे की, भारत आता इशारे देत नाही तर थेट कारवाई करतो. हीच भीती आता मसूद अजहरसारख्या क्रूर दहशतवाद्यांना शांत झोपू देत नाही.
अफगान तालिबान सरकार जरी उघडपणे सांगत असले की ते कोणत्याही दहशतवादी संघटनेला आश्रय देत नाही, तरी वास्तव हे आहे की तालिबानचे अनेक कमांडर जुन्या संबंधांमुळे अजहरसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत. त्याचप्रमाणे काश्मीरमधील अल् कायदाची शाखा लश्कर-ए-गजवात-उल-हिंदचा मोठा चेहरा डॉ. अब्दुल रऊफ सध्या अफगानिस्तानच्या कुनार प्रांतात लपला आहे. त्याने तिथल्या एका दहशतवादी प्रशिक्षण केंद्रात आपला ठावठिकाणा बनवला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या ऑपरेशन सिंदूरसारख्या रणनीतीने त्या दहशतवादी अड्ड्यांना थेट लक्ष्य केले आहे, ज्यांना यापूर्वी कोणीही हात लावू शकत नव्हते. त्यामुळेच आता तो दहशतवादी म्होरक्या भीतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळत आहे.