नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलातील मिग-२१ हे लढाऊ विमान सातत्याने होणा-या अपघातावरून नेहमीच चर्चेत असते. याच कारणावरून या लढाऊ विमानाची ओळख उडत्या शवपेट्या अशी राहिली आहे. हे लढाऊ विमान सप्टेंबर महिन्यात निवृत्त होणार असून, या विमानाला समारंभपूर्वक निरोप दिला जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे अलिकडे या लढाऊ विमानाचे अपघात वाढले असले तरी मिग-२१ लढाऊ विमानाचे भारतीय हवाई दलात महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
मिग-२१ फायटर जेटची अलिकडची काही वर्षे आव्हानात्मक राहिली आहेत. मात्र, त्या आधी भारताच्या अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये मिग-२१ ने मोलाची भूमिका बजावली. यात १९६५ च्या युद्धापासून ते अलीकडच्या ऑपरेश सिंदूरपर्यंत मिग फायटर जेटने आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलातील मिग फायटर जेटचे महत्त्वपूर्ण योगदान भारतीयांना विसरता येणार नाही.
१९६२ मध्ये मिग-२१ लढाई विमान भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल झाले. तेव्हापासून अनेक महत्त्वाच्या युद्धांत ही विमाने भारतीय हवाई दलाच्या मोहिमांचा प्रमुख भाग राहिली आहेत. यात १९६५ व १९७१ ची भारत-पाकिस्तान युद्धे, १९९९ चे कारगिल युद्ध, २०१९ चा बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानच्या हद्दीत व पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेली हवाई मोहीम याचा समावेश आहे.
त्यातच मिग-२१ लढाऊ विमानांमध्ये १९६० च्या दशकापासून आतापर्यंत अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या. या आधीच ही विमाने निवृत्त करणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्याजागी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणारी भारतीय बनावटीची एलसीए तेजस एमकेवन ए ही लढाऊ विमाने सज्ज होण्यास विलंब लागला. त्यामुळे पर्यायाने मिग-२१ विमानांची निवृत्तीही लांबली. अखेर आता या प्रकारातील शएवटच्या मिग-बायसन श्रेणीतील लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये निवृत्त केले जाणार आहे.
मिग-२१ बायसन श्रेणीतील
३१ लढाऊ विमाने ताफ्यात
सोव्हिएत युनियनमध्ये मिकोयान-गुरेविच ब्युरोने ही विमाने तयारी केली होती. त्या नावावरूनच या विमानांना मिग-२१ असे नाव पडले. जवळपास ६० देशांनी या विमानांना आपल्या हवाई दलात समाविष्ट करून घेतले होते. सर्वाधिक मिग-२१ विमाने भारताच्या ताफ्यात होती. सध्या मिग-२१ बायसन श्रेणीतील ३१ विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आहेत.
आतापर्यंत ४०० अपघात
अनेक मोहिमांमध्ये भारतीय हवाई दलाकडून शत्रूवर प्रभावी मारा करणा-या मिग-२१ लढाऊ विमानांवर गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांमुळे ठपका ठेवण्यात येत आहे. एका आकडेवारीनुसार या विमानांचे जवळपास ४०० अपघात झाले आहेत.