सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सतर्क, सीमा भागात अलर्ट जारी
जम्मू : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेला लागून असलेल्या काही भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमेलगतच्या सर्व भागात सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. गावापासून शहरापर्यंत अलर्ट जारी करतानाच राजस्थानमध्ये लष्कराचा युद्ध सराव सुरू आहे. एलओसी असो किंवा वाळवंटातील रणरणत्या उन्हात भारतीय लष्कराचा युद्धाभ्यास सुरू असून, लष्करी यंत्रणा सर्वत्र सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सैन्याची २४ तास गस्त सुरू आहे. जैसलमेर येथील सीमा रेषेवर भारतीय बीएसएफचे जवान पूर्णपणे तैनात करण्यात आले आहेत. एलओसीवर वाढलेल्या तणावामुळे बीएसएफचे जवान हाय अलर्ट मोडवर आहेत. अशातच अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर जैसलमेर येथील सीमा रेषेवर दुपारचे तापमान ४५ अंशांवर असलेल्या कडक उन्हात बीएसएफच्या जवानांचा सराव सुरू आहे.
सीमेवर हालचाली वाढल्या
भारत-पाकमध्ये तणाव वाढल्याने बीएसएफने सीमेवरील शेतक-यांना कुंपणाजवळील गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करून शेत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुद्वारातून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यामुळे शेतक-यांनी तातडीने कामाला सुरुवात केली. पठाणकोट ते फाजिल्कापर्यंत ५५३ कि.मी. सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
छुप्या कारवायांवर
आता धु्रवची नजर
पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराने पुन्हा मॉडर्न लाइट हेलिकॉप्टर ध्रुवचे उड्डाण पूर्ववत केले आहे. लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाने चालवलेल्या ३३० हून अधिक ध्रुव हेलिकॉप्टरच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर जानेवारीत क्रॅश झाल्यानंतर ध्रुवच्या उड्डाणावर बंदी घातली होती. मात्र, भारतीय लष्कराला मदत करण्यासाठी एएलएच ध्रुवला मर्यादित उड्डाणाची परवानगी दिली आहे. स्वदेशी हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ हे ५.५ टन वजनाच्या वर्गातील डबल इंजिन असणारं मल्टी-रोल हेलिकॉप्टर आहे. ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने आतापर्यंत ३४० हून अधिक ध्रुव हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. हे हेलिकॉप्टर सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जाते.