आता एकाच शिफ्टमध्ये घेणार परीक्षा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट पीजी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने हा निर्णय जाहीर केला. ही नीट पीजी परीक्षा १५ जून रोजी २ शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. परंतु ही परीक्षा २ शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या, असे निर्देश या आधी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नीट पीजी परीक्षा दोन वेगवेगळ््या शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार आता ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार असल्याचे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने स्पष्ट केले आहे. त्यामुळे १५ जून रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
नीट पीजीच्या परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी ती दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी आधी नियोजित केंद्रांपेक्षा अधिक केंद्रांची आणि इतर मूलभूत गोष्टींची गरज पडणार आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. या संबंधित पुढची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल, असे नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने स्पष्ट केले आहे.