पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत. तसेच आपल्या नागरिकांना पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. भारताने १९६० मधील सिंधू जल करार रद्द केला. अटारी येथील एकमेव कार्यरत जमीन सीमा क्रॉसिंगसुद्धा बंद केली. आता भारतात सर्वत्र झाडाझडती करीत पाक नागरिकांचा शोध सुरू करून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) गुरुवारी घेतलेल्या निर्णयांचाच हा एक भाग असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत सरकारने तात्काळ प्रभावाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत तर पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहतील, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. भारतात सध्या असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावे लागेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, वैध भारतीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानींची नेमकी संख्या किंवा सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांची संख्या त्वरित निश्चित करता येत नाही. तथापि, जिल्हानिहाय देशात किती पाकिस्तानी आहेत, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे. हे सर्व नागरिक लाँग टर्म व्हिसावर कोल्हापूरमध्ये राहत आहेत. यामध्ये तीन मुस्लिम महिलांचा समावेश आहे तर उर्वरित सर्व हिंदू आहेत. दुसरीकडे भारतीय बाजूने यापूर्वी अटारी भू-सीमेवरून देशात प्रवेश करणाºया सर्व पाकिस्तानींना १ मे पर्यंत देश सोडण्यास सांगितले होते आणि पाकिस्तानी नागरिक आता सार्क व्हिसा सूट योजनेसाठी पात्र राहणार नाहीत, असे म्हटले होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांवरील दोन दशकांतील सर्वात मोठा हल्ला आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. २०१९ मध्ये पुलवामामध्ये जवानांवर दहशतवाही हल्ला झाला होता.
पहलगाम हल्ल्याशी सीमापार संबंधांबद्दल माहिती देण्यात आलेल्या सीसीएसच्या बैठकीनंतर भारत सरकारने बुधवारी पाच दंडात्मक उपाययोजनांची घोषणा केली. पाकिस्तानच्या तीन लष्करी अधिकाºयांना हद्दपार केले आणि पाकिस्तानला नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयातील कर्मचाºयांची संख्या ५५ वरून ३० पर्यंत कमी करण्यास सांगितले.