एनडीएला जोर का झटका
पाटणा : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासोबतच बिहारमध्येही काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष झाला. त्यात पुतण्यानं काकांना मात दिली. चिराग पासवान यांनी पशुपती पासवान यांना धूळ चारली. काका पशुपती पारस यांनी पुतण्याला दणका देत त्याच्या ताब्यातून पक्ष हिसकावला. त्यावेळी काका आणि पुतण्याचे पक्ष भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएमध्येच होते. पण भाजपने पारस यांच्या पक्षाला एकही जागा दिली नाही तर चिराग यांच्या पक्षाला ५ जागा दिल्या. चिराग यांनी पाचही जागा निवडून आणल्या. केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर आता त्यांचे काका असलेल्या पशुपती पारस यांनी एनडीएची साथ सोडण्याचा निर्णय सोमवार, दि. १४ एप्रिल २०२५ रोजी जाहीर केला.
एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (रालोजप) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी केली. आमच्या पक्षाचे आता एनडीएसोबत कोणतेही नाते नसेल, असं म्हणत त्यांनी बिहारमधील नितीश कुमार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नितीश सरकार दलितविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. आजपासून आम्ही एनडीए सोबत नाही. त्यांच्याशी आमचा कोणताच संबंध नाही, अशी घोषणा त्यांनी केली. आता पशुपती पारस आघाडीत सामिल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नितीशकुमार आणि भाजप महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जो पक्ष आम्हाला येणा-या निवडणुकीत योग्य सन्मान देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, त्यासंदर्भात आम्ही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ, कोणासोबत युती करायची हे अजून निश्चित झाले नाही, मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे पशुपती कुमार पारस यांनी म्हटले आहे.