नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी संध्याकाळी नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवनाच्या गणतंत्र मंडप या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींनी २०२५ साठी जाहीर करण्यात आलेले ४ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि ५७ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. यावर्षी एकूण १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले, यापैकी पहिल्या टप्प्यात ७१ जणांना २८ एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मनोरंजन विश्वातील काही दिग्गजांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला.
कलाविश्वातील दिग्गजांचा सन्मान
प्रामुख्याने अभिनेते अजित कुमार, नंदमुरी बालाकृष्ण, दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कलाकारांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. तसेच ४ दशकांमध्ये ६० हून अधिक अल्बम आणि ५०० हून अधिक गजल गाणा-या दिवंगत गजल गायक पंकज उधास यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. त्यांच्या पत्नी फरिदा पंकज उधास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यासोबतच मल्याळम लेखक-दिग्दर्शक, पटकथा लेखक, आणि मल्याळम भाषा, सिनेमा आणि साहित्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणा-या एम. टी. वासुदेवन नायर यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कर्नाटकातील प्रसिद्ध व्हॉयलिन वादक डॉ. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रसिद्ध गायिका के.ओमानकुट्टी अम्मा, जसपिंदर नरुला, गायक श्री जोयनाचरण बाथरी, भेरू सिंह चौहान, रणेंद्र भानू मजूमदार, कर्नाटक सिने इंडस्ट्रीतील स्टंट दिग्दर्शिक हसन रघु यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.