मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश
मुंबई : प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा बसल्या जागी पुरविण्यासाठी आणि सरकारी कार्यालयातील येणा-या अडचणींच्या तक्रारी करण्यासाठी सरकारने आपले सरकार पोर्टल व मोबाईल अॅप ही सेवा सुरू केली. अनेकदा या पोर्टलवरून सेवा उपलब्ध करताना किंवा तक्रारीचा निपटारा करताना प्रशासकीय अधिकारी व कर्मचा-यांकडून दिरंगाई केली जाते. पण आता दिरंगाई करणा-या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दरदिवशी १ हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे निर्देश दिले.
राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत १०२७ सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी ५२७ सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध आहेत. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. यात दिरंगाई करणा-या प्रशासकीय विभाग प्रमुखाला दरदिवशी १ हजार रुपयांचा दंड लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या. त्यामुळे आपले सरकार पोर्टलवरील शासकीय सेवा अधिक गतिमान होणार आहेत.
या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन, अॅग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या १३८ इंटिग्रेटेड सेवा ३१ मे २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिल्या. तसेच उर्वरित ३०६ अधिसूचित सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.