नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एअर इंडिया-१७१ विमान अपघाताच्या तपासणी अहवालावर वैमानिकांच्या संघटनेने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पायलट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने म्हटले आहे की, तपासणीत वैमानिकांना लगेच दोषी ठरवणे योग्य नाही. तपासणी निष्पक्षपणे व्हावी आणि सर्व बाबी विचारात घेतल्या जाव्यात, असे म्हटले. विमान दुर्घटना तपासणी ब्युरोने एक अहवाल जारी केला. हा अहवाल प्राथमिक आहे. पीएआय संघटनेला वाटते की तपासणी योग्य दिशेने जात नाही. तपासणीतील गोपनियतेवरून संघटनेने आश्चर्य व्यक्त केले. तसेच तपासणीसाठी पात्र लोकांचा समावेश नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
या अहवालासंदर्भात पीएआयने एक निवेदन जारी केले आहे. यात वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका बातमीचा हवाला देण्यात आला. त्यामध्ये इंजिनच्या फ्यूल कंट्रोल स्विचच्या हालचालीवर तपासणी केंद्रित केली. तपासणी अहवालातही याच गोष्टीला अपघाताचे कारण मानले आहे. अहवालात दोन वैमानिकांच्या संभाषणाचा उल्लेख आहे. त्यात एक वैमानिक दुस-याला विचारतो, तुम्ही कट ऑफ का केले?, त्यावर दुसरा वैमानिक उत्तर देतो, मी असे काही केले नाही.
अहवालात असे म्हटले आहे की, हवेत असताना फ्यूल कटऑफ स्विच हलल्यामुळे इंजिन बंद झाले. पीएआयचे म्हणणे आहे की, ही तपासणी वैमानिकांना दोषी मानून केली जात आहे. यावर संघटनेने जोरदार आक्षेप घेतला. तपासणी ब्युरोच्या अहवालानुसार विमानाचा वेग १८० नॉट्स आयएएसपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर लगेचच दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच एकापाठोपाठ रन (चालू) स्थितीतून कटऑफ (बंद) स्थितीत आले. दोन्ही स्विचमध्ये एक सेकंदाचा फरक होता. यामुळे इंजिनांना इंधन मिळणे बंद झाले आणि ती स्लो झाले. रन म्हणजे इंजिनला इंधन मिळत आहे. कट ऑफ म्हणजे इंधनाचा पुरवठा बंद झाला आहे.
एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाची दोन्ही इंजिने बंद झाली. त्यामुळे वैमानिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर काही क्षणातच विमान अहमदाबादमध्ये कोसळले. प्राथमिक तपासणी अहवालात हे उघड झाले आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये ऐकले आहे की, एका वैमानिकाने दुस-याला विचारले की त्याने इंधन का बंद केले. त्यावर त्याला उत्तर मिळाले की, त्याने असे केले नाही.
लंडनला जाणारे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाला धडकले आणि अपघात झाला. या दुर्घटनेत विमानात असलेले २४२ लोक आणि जमिनीवरील १९ लोक मरण पावले.
अहवालाची माहिती लिक कशी झाली?
वैमानिकांच्या असोसिएशनने सांगितले की, वॉल स्ट्रीट जर्नलने १० जुलै रोजी एक बातमी प्रकाशित केली. त्यामध्ये इंधन नियंत्रण स्विचच्या चुकीच्या हालचालीचा उल्लेख होता. पीएआयने प्रश्न विचारला की, ही माहिती त्यांना कशी मिळाली? संघटनेने इंधन नियंत्रण स्विच गेटच्या सर्व्हिस अॅबिलिटीवर एक बुलेटिनचा हवाला दिला आहे. त्यात संभाव्य बिघाडाबद्दल सांगितले होते.