लंडन : वृत्तसंस्था
विम्बल्डन २०२५ मधील महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी इगा स्वियाटेक (पोलंड) आणि अमांडा अनिसिमोवा (यूएसए) यांच्यात रंगला. या स्पर्धेत पोलंडच्या आठव्या मानांकित इगा स्वियाटेकने अखेर विम्बल्डनच्या महिला एकेरी विजेतेपदावर आपले नाव कोरले. सेंटर कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात तिने १३ व्या मानांकित अमांडा अनिसिमोवा हिला सरळ सेटमध्ये पराभूत केले.
स्वियाटेकने पहिल्या सेटमध्ये अनिसिमोवाला ६-० ने पराभूत केले आणि दुस-या सेटमध्येही तसाच एकतर्फी खेळ करत ६-० अशी विजयाची मोहोर उमटवली. स्वियाटेकच्या कारकिर्दीतील हे पहिले विम्बल्डन विजेतेपद आहे. स्वियाटेकने पहिला सेट फक्त २५ मिनिटांत ६-० ने पटकावला. तिने अमांडा अनिसिमोवाला लव्हवर रोखत सेट संपवला. अनिसिमोवाने १४ अनफोर्स्ड एरर केल्या तर स्वियाटेककडून फक्त २ चुका झाल्या. दुस-या सेटमध्येही स्वियाटेकने पूर्ण पकड ठेवली आणि एक तासाच्या आतच विजेतेपद आपल्या नावे केले.
इगा स्वियाटेकने सेमीफायनलमध्ये बेलिंडा बेनसिचला ६-२, ६-० ने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता तर २३ वर्षांच्या अनिसिमोवाने टॉप मानांकित आर्यना सबालेन्काला तीन सेटच्या थरारक सामन्यात ६-४, ४-६, ६-४ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत पोहोचली.
२०१६ पासून दरवर्षी नवीन विजेता
२०१६ पासून विम्बल्डन महिला एकेरी स्पर्धेत दरवर्षी नवीन महिला विजेत्या ठरल्या आहेत. २०१६ नंतर क्रमाक्रमाने गार्बाइन मुगुरुजा (२०१७), एंजेलिक कर्बर (२०१८), सिमोना हालेप (२०१९), ऐश बार्टी (२०२१), एलेना रिबाकिना (२०२२), मार्केटा वोंड्रोसोवा (२०२३) आणि बारबोरा क्रेजिकोवा (२०२४) यांनी विम्बलडनचा सुवर्णपदक जिंकला. आता पोलंडची इगा स्वियाटेकने २०२५ चा विम्बलडन महिला एकेरी खिताब आपल्या नावावर केला आहे.
स्वियाटेकचा सहावा ग्रँडस्लॅम किताब
इगा स्वियाटेकने आपल्या कारकिर्दीतील सहावे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. यामध्ये तिने आतापर्यंत चार वेळा फ्रेंच ओपन, एकदा यूएस ओपन आणि आता पहिल्यांदाच विम्बल्डन जिंकला. २०२५ मध्ये तिचा ग्रँड स्लॅम विजय-पराजय विक्रम १७-२ आहे. यापूर्वी ती ऑस्ट्रेलियन ओपन आणि रोलँड गॅरोसच्या उपांत्य फेरीत पोहोचली होती.
स्वियाटेकचा खास विक्रम
विम्बल्डन महिला एकेरी फायनलमध्ये स्वियाटेक पहिल्या सेटमध्ये ६-० असा स्कोर घेऊन जिंकणारी ओपन एरातील चौथी महिला खेळाडू ठरली. आधी बिली जीन किंग (१९७३,१९७५), क्रिस एवर्ट (१९७४) आणि मार्टिना नवरातिलोवा (१९८३) या तीन महान खेळाडूंनी हेच यश मिळवले होते.