कायद्याचा होऊ शकतो गैरवापर : ठाकरेंनी व्यक्त केली भीती
मुंबई : प्रतिनिधी
जनसुरक्षा विधेयकाला राजकीय दुरुपयोगाचा वास येत आहे. नक्षलवाद संपत आलाय मग हा कायदा कोणासाठी आणताय, विधेयकात कुठेही नक्षलवाद, असा उल्लेख नाही. हे भाजप सुरक्षा विधेयक आहे का? अशी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.
विधानसभेत काल या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आज विधान परिषदेत हे विधेयक मंजूर करण्यात आले. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, बहुमताच्या जोरावर सरकारने हे विधेयक विधानसभेत मंजूर केल्याबद्दल टीका केली. सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत असल्यामुळे ते त्याचा दुरूपयोग करीत आहेत. मात्र, त्या विधेयकातील काही गोष्टींना आमचा विरोध आहे. सरकारच्या कथनी व करणीत फरक आहे. या विधेयकात कुठेही नक्षलवादाचा उल्लेख नाही. उलट डाव्या, उजव्या संघटनांचा उल्लेख केला आहे. पण हे ठरवणार कोण, आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत सर्वसमावेशकता, समानता, सामाजिक न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य याचा स्पष्ट उल्लेख आहे. मग हे डावे आणि उजवं असा फरक करण्याची गरज काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
सरकारला देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर त्यांनी आम्हाला विचारायची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित विधेयक आणत असाल तर आमचा त्याला विरोध आहे, असे ठाकरे म्हणाले.
जनसुरक्षा विधेयकात
नक्षलवादाचा उल्लेख नाही
जनसुरक्षा विधेयकात नक्षलवादाचा, दहशतवादाचा बिमोड करायचा, असा त्यांचा दावा आहे; परंतु या विधेयकात कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवादाचा उल्लेख नाही. सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारांच्या संघटनांवर कारवाई, असा उल्लेख आहे. मुळात डावा-उजवा कसे आणि कोण ठरवणार? हे संविधानाच्या विरोधात आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला.
जनसुरक्षा विधेयकाला
वंचित देणार आव्हान
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, या विधेयकाला थेट फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचे म्हटले आहे.