लातूर : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार तथा भाजप बीडचे माजी जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख यांच्या गाडीचा सोमवार दि. २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर औसा तालुक्यातील बेलकुंड येथे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातानंतर माजी आमदार आर. टी. देशमुख यांना उपचारासाठी लातूरच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक खाजगी अंगरक्षकासह चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माजी आमदार आर. टी. देशमुख हे सोलापूरहून लातूरच्या दिशेने खाजगी अंगरक्षक व चालकासह एम. एच. ४४ एडी २७९७ या क्रमांकाच्या गाडीतून सोमवारी जात असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड येथील उड्डाणपूलावरुन चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने उड्डाणपूलावरील लोखंडी रॉड तोडून गाडी सर्विस रोडच्या बाजूला येऊन पडली. या भीषण अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले होते.
यावेळी जवळच असलेल्या पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार अनंत कांबळे, रतन मोरे, फिरोज शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीच्या खाली अडकून पडलेले माजी आमदार आर. टी. देशमुख यांना बाहेर काढून त्यांना रुग्ण वाहिकेच्या मदतीने लातूरकडे रवाना केले मात्र रस्त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा भाजपाचे आर. टी. देशमुख यांनी ३७ हजार मताधिक्याने पराभव केला होता. बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून परिचित होते.