नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण
ठाणे :-‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला ज्येष्ठ संपादक, माध्यमतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांनी सदिच्छा भेट दिली. ठाणे येथील विजू माने यांच्या अद्ययावत कार्यालयात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात त्यांनी नव्याने कार्यरत होणाऱ्या पत्रकारांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. पत्रकारितेची नैतिकता, सामाजिक जबाबदारी,सत्यनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांवर त्यांचे विचार मांडले.
‘जबरी खबरी’ हा प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि कल्पक “इमेज बिल्डर व इव्हेंट ऑर्गनायझर” अशी ख्याती असलेले विजू माने यांचा डिजिटल उपक्रम असून, समाजाभिमुख आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी कार्यरत आहे. या कार्यक्रमाला विजू माने यांच्यासह चॅनेलची संपूर्ण टीम उपस्थित होती.कार्यक्रमात राजा माने यांनी ‘जबरी खबरी’चे चॅनलचे प्रमुख सल्लागारपद स्वीकारले. सोबतच कुंदन हुलावडे आणि दीपक नलावडे यांनी देखील सल्लागारपद स्वीकारले. राजा माने हे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना तसेच प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष असून, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. पत्रकारांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावलेली आहे.
यावेळी पत्रकारांना उद्देशून बोलताना राजा माने म्हणाले, “डिजिटल मिडिया ही आजच्या पत्रकारितेची गरज आणि भविष्य आहे. मात्र केवळ ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’च्या मागे न लागता समाजभान ठेवणारी, सत्याशी निष्ठा राखणारी आणि लोकशाहीचे मूल्य जपणारी पत्रकारिता हीच खरी गरज आहे. ‘जबरी खबरी’ चॅनेलने अशीच दिशा कायम ठेवावी, हीच माझी अपेक्षा आहे.”‘जबरी खबरी’ चॅनेल स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या, अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि सामाजिक भान असलेले वार्तांकन सादर करते.