मोदींचे प्रत्युत्तर, युद्धविरामासाठी मध्यस्थी नाही
ऑपरेशन सिंदूरवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरवरून लोकसभेत सोमवारी आणि मंगळवारी वादळी चर्चा झाली. यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारच्या चुकांवर बोट ठेवून वाभाडे काढले. सत्ताधा-यांनीही विरोधकांच्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर देताना विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा आमच्या देशाने २२ मिनिटांत बदला घेतला. भारतीयांना अपेक्षित होती, तशा प्रत्युत्तराची कारवाई केली. जगातील कुठल्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखण्यास सांगितले नव्हते, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत सोमवारपासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू होती. या चर्चेत भारताने अचानक मान्य केलेल्या युद्धविरामाचा निर्णय केंद्रस्थानी राहिला होता. त्यातच युद्धविरामाच्या वेळी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: मध्यस्थी केल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून भारताने युद्धविरामाचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून घेतला का, असा सवाल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. या सर्व प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आणि जगातील कुठल्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर रोखण्यास सांगितले नव्हते, असे स्पष्ट केले.
९ मे रोजी रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वॉन्स यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, माझी तेव्हा लष्कराच्या अधिका-यांसोबत बैठक सुरू होती. त्यामुळे मला त्यांचा फोन उचलता आला नाही. त्यानंतर मी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असे सांगितले. त्यावेळी मी त्यांना पाकिस्तानने अशी आगळीक केली तर ती त्यांना खूप महागात पडेल. पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही त्यांच्यावर त्यापेक्षा मोठा हल्ला करू. गोळीचे उत्तर गोळ््याने दिले जाईल, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर ९ मेच्या रात्रीपासून १० मेच्या सकाळपर्यंत आम्ही जोरदार हल्ले करून पाकिस्तानची सैन्यशक्ती नष्ट केली. हेच आमचे प्रत्युत्तर होते.
९ मे रोजी मध्यरात्रीपासून १० मे रोजी सकाळपर्यंत भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या प्रत्येक ठिकाणांवर हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकणे भाग पडले. जेव्हा तगडा प्रहार केला, तेव्हा पाकिस्तानने डीजीएमओंना फोन करून आता पुरे झाले, हल्ला थांबवा, अशी विनवणी केली. त्यानंतर १० मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सुरू असलेली कारवाई थांबविण्याची घोषणा केली. त्यानंतर याबाबत वेगवेगळ््या गोष्टी बोलल्या गेल्या. यासंबंधी सीमेपलिकडून अपप्रचार केला गेला. काही लोक पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला पुढे रेटत होते. परंतु भारताची भूमिका स्पष्ट होती, असे पंतप्रधान म्हणाले.
पाकिस्तानला धडा शिकविला
पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला. २२ एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने २२ मिनिटांत घेतला आणि दहशतवाद्यांना गाढले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणा-या आकांची झोप उडाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधूपासून ते सिंदूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.