नेमका वाटा कोणाला?, करिष्मा कपूरच्या मुलांना काय मिळणार?
मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर एक लोकप्रिय व्यक्तीमत्व होते. त्यांचे गुरुवार, दि. १२ जून २०२५ रोजी लंडनमध्ये निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. आघाडीचे उद्योजक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. ते ऑटो पार्टस बनवणा-या जगातील टॉपच्या कंपनीचे प्रमुख होते. ते ऑटो कंपोनंटची निर्मिती करणा-या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती आणि कंपनीच्या ३१ हजार कोटी रुपयांचे व्यावसायिक साम्राज्य चर्चेत आले आहे. २०१५ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर संजय कपूर यांनीच सर्व कारभार सांभाळला आणि कंपनी एका वेगळ््या उंचीवर नेऊन ठेवली. त्यांच्यामुळेच सोना कॉमस्टार जगातील टॉप ऑटो कंपोनंट कंपन्यांपैकी एक बनली आहे. परंतु संजय कपूर यांच्या निधनाने या हजारो कोटींच्या संपत्तीचे काय होणार, असा प्रश्न पडलेला आहे. एवढेच नव्हे, तर करिश्मा कपूर आणि तिच्या दोन लेकरांना काय मिळणार, याचीही उत्सुकता आहे.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार संजय कपूर यांच्या या कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ३१ हजार कोटी रुपये (सुमारे ४ अब्ज डॉलर्स) आहे. दरम्यान, संजय कपूर यांच्या मृत्यूची बातमी कळताच कंपनीचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले. आता त्यांच्या पश्चात या व्यवसायाचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. संजय कपूरच्या निधनाने गुंतवणूकदार आणि भागधारकांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. त्यांना शांत करण्यासाठी सोना कॉमस्टारकडून एक निवेदन जारी करण्यात आले. त्यात आम्ही आमच्या ग्राहकांना, कर्मचा-यांना आणि भागधारकांना खात्री देतो की, त्यांच्या वारशाचा सन्मान करत सध्याचे कामकाज तसेच चालू राहील. सोना कॉमस्टारमध्ये त्यांनी नियोजित केलेल्या आमच्या ध्येयाला आणि मूल्यांना पुढे नेऊन त्यांचा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे म्हटले.
करिष्मा कपूर संजय यांची दुसरी पत्नी होती. त्या दोघांना समायरा (२०) आणि कियान (१४) अशी दोन मुले आहेत तर संजय कपूर यांची तिसरी आणि सध्याची पत्नी असणा-या प्रिया सचदेवला अझारियस (६) नावाचा मुलगा आहे. यांच्यापैकी कोणीही कंपनीचा भाग नसल्यामुळे त्यांच्याकडे सध्या कंपनीची जबाबदारी जाईल, याची शक्यता कमी आहे. आता संजयच्या बहिणी कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढे येऊ शकतात. तसेच सध्याचे बोर्डही कामकाजासाठी पुढाकार घेऊ शकते.
१०,३०० कोटी रुपयांच्या
संपत्तीचा वारसदार कोण?
संजय कपूर यांच्या निधनानंतर फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार त्यांची एकूण संपत्ती १.२ बिलियन डॉलर (१०,३०० कोटी रुपये) होती. त्यांची संपत्ती २०२२ आणि २०२४ या वर्षांत सर्वाधिक होती. जो आकडा १.६ बिलियन डॉलर (१३,००० कोटी रुपये) पर्यंत पोहोचला होता. आता या मालमत्तेचे व्यवस्थापन त्यांची पत्नी प्रिया सचदेव यांच्याकडे सोपवले जाऊ शकते.
मुलांना किती रक्कम मिळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय कपूर यांनी त्यांच्या सर्व मुलांसाठी आधीच योजना आखल्या होत्या. करिष्मा आणि संजय यांची मुले समायरा आणि कियान यांना संजय यांनी आधीच १४ कोटी रुपयांचे बाँड भेट दिले आहेत. याशिवाय दोघांनाही प्रत्येकी दरमहा १० लाख रुपये दिले जातील, असे वृत्त आहे. परंतु अधिकृत माहिती आलेली नाही.
तीन वेळा केले लग्न
संजय कपूर यांनी पहिले लग्न डिझायनर नंदिता महतानीशी केले होते. त्यांनी १९९६ मध्ये लग्न केले, पण चारच वर्षांनी २००० साली त्यांचे नाते संपुष्टात आले. त्यानंतर त्यांनी २००३ साली बॉलिवूड स्टार करिष्मा कपूर हिच्याशी लग्न केले. त्यांना समायरा आणि कियान नावाची दोन मुलेही आहेत. २०१६ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१७ साली संजयने मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया सचदेवशी लग्न केले आणि दोघांना अझारियस नावाचा मुलगा आहे.