१० सॅटेलाईटची २४ तास टेहळणी, लष्करी रणनीतीला इस्रोची मोलाची साथ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या सातत्याने भारताविरुद्ध कुरापती सुरूच होत्या. परंतु पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. दहशतवाद्यांचे पालन पोषण करणा-या पाकिस्तानातील अतिरेकी तळांना टार्गेट करण्यात आले. भारताच्या या कारवाईने बिथरुन गेलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला चढवला. त्याचे इंडियन एअर फोर्सने चोख प्रत्युत्तर दिले. त्यांच्या एअरबेसचे नुकसान केले. सोबतच रडार सिस्टिम नेस्तनाबूत केली. भारतीय लष्कराच्या अचूक हल्ल्याला १० सॅटेलाईटची मोलाची मदत झाली. कारण सॅटेलाईटद्वारे सतत लक्ष्याचा वेध घेतला जात होता. त्यामुळे इस्रोची मोलाची मदत झाली. पाकिस्तानवर केलेल्या या कारवाईचे सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून पुरावे मिळाले आहेत. दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी एअरबेसला कसे टार्गेट केले, हे यातून स्पष्ट होते.
या दरम्यान शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन असलेल्या सॅटेलाइटबद्दल इस्रोच्या चेअरमनचे एक स्टेटमेंट समोर आले आहे. देशाच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रणनितीक उद्देशाने कमीत कमी १० सॅटेलाइट २४ तास काम करत आहेत. तुम्हाला आपल्या शेजा-यांबद्दल सर्व काही माहीत आहे. जर आपल्याला आपली सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर सॅटेलाइटच्या माध्यमातून सेवा करावी लागेल, असे इस्रोचे चेअरमन वी नारायणन म्हणाले.
इस्रोने आतापर्यंत एकूण
१२७ सॅटेलाईट केले लॉंच
आम्हाला आपल्या ७ हजार किलोमीटरमध्ये पसरलेल्या सागरी किनारा क्षेत्रावर लक्ष ठेवायचे असते. उपग्रह आणि ड्रोन टेक्नोलॉजीशिवाय ब-याच गोष्टी साध्य करणे आपल्याला शक्य नाही. आतापर्यंत इस्रोने १२७ सॅटेलाइट लॉन्च केले आहेत. यात खासगी ऑपरेटर आणि शैक्षणिक संस्थांचे उपग्रह आहेत.
उपग्रहांद्वारे टेहळणी
भारताचे डझनभर हेरगिरी करणारे आणि टेहळणी उपग्रह आहेत. हे कार्टोसॅट आणि रिसॅट सीरीजमधील उपग्रह आहेत. फक्त हेरगिरीसाठी हे उपग्रह विकसित करण्यात आले आहेत. अवकाशातून टेहळणी क्षमता वाढवण्यासाठी पुढच्या पाच वर्षात ५० पेक्षा जास्त उपग्रह लॉन्च करण्याची भारताची योजना आहे. या उपग्रहांमुळे इंडियन आर्मी, नौदल आणि एअर फोर्सला शत्रूच्या प्रत्येक हालचालीची अजून बारीक माहिती मिळेल.
पाकिस्तानची पुरती पोलखोल
भारतीय सैन्यदलांनी रविवारी पत्रकार परिषद केली. यामध्ये पाकिस्तानात केलेल्या कारवाईचे पुरावे दिले. सैन्याने सॅटेलाइट फोटोंद्वारे दाखवले की, त्यांनी दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी एअरबेसला कसे टार्गेट केले. दहशतवादी तळ नष्ट झाल्याचे फोटोंमध्ये स्पष्ट दिसले. सॅटेलाइट फोटोंमुळे पाकिस्तानलाही काही लपवता येणार नाही आणि फॉरेन मीडियालासुद्धा पुरावे दिले. सॅटेलाइट फोटोंनी पाकिस्तानची पुरती पोलखोल केली आहे.