मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १५ जुलै रोजी शशिकांत शिंदे अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.
जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी केली होती. १० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनीच त्यांनी ही इच्छा जाहीर केली होती. ते म्हणाले होते की, ह्लपवार साहेबांनी मला भरपूर संधी दिल्या. तब्बल ७ वर्षांचा कार्यकाळ मला मिळाला. आता पक्षाला नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत मी साहेबांना विनंती करतो, शेवटी हा पक्ष पवार साहेबांचाच आहे. त्यांनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले. १९९९ साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि १२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.
शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला. त्यानंतर शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदेंविरोधात त्यांचा पराभव झाला होता. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत. आता त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे.