२२७ प्रवाशांची पाचावर धारण, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
श्रीनगर : वृत्तसंस्था
दिल्ली ते श्रीनगराला उड्डाण करणारे इंडिगोच्या विमानाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या विमानात २२७ प्रवासी असताना अचानक वातावरणात बदल होऊन गारांचा मारा सुरु झाला.विमानातील प्रवाशांचा पाचावर धारण बसली. या गारांच्या मा-याने विमानाचे नाकच तुटल्याने या विमानाची श्रीनगर येथे इमर्जन्सी लँडींग झाली. सर्व प्रवासी सुखरुप असून विमानाला मोठे नुकसान झाल्याने हे विमान दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे.
विमान प्रवासी वाहतुकीत विमान कंपन्या आणि शासनाच्या उड्डाण मंत्रालयाकडून विशेष काळजी घेतली जाते. त्यात पावसाळ््याच्या दिवसांत विमान कंपन्यांना व विमानसेवेला महत्त्वाचे संदेशही सातत्याने दिले जातात. त्यामुळे दिल्ली-श्रीनगर विमान प्रवासात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. इंडिगोच्या या विमानातील सर्वच २२७ प्रवासी सुखरुप असल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले.
इंडिगो विमानच्या या उड्डाणाचे ट्रॅकिंग पाहिल्यास हे विमान वादळात सैरभैर झाले होते. आकाशातील वादळात विमान गोल-गोल फिरत असल्याचे लक्षात येताच विमानातील क्रू मेंबर आणि पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एअरपोर्ट अधिका-यांच्या म्हणण्यांनुसार विमानाचे इमर्जन्सी लँडिग करताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, तसेच सर्व सूचना व मानकांचे पालन करण्यात आले.
बर्फ आणि गारांचा मारा
दिल्ली ते श्रीनगर हवाई मार्गावर विमानाचा प्रवास सुरू असताना, बर्फाचा पाऊस आणि गारा पडत होत्या. त्यामध्ये विमानाच्या पुढील बाजूच्या काही भागाचे नुकसान झाले. विमान आकाशात हेलकावे घेत असताना प्रवाशांची धाकधूक वाढली होती. मात्र, फ्लाईट पायलट आणि केब्रिन क्रू मेंबर्सने सर्वच सूचना व नियमांचे पालन करत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.