पाकिस्तानचा भारताच्या २६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतातील २६ ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे ६ एअरबेस उद्ध्वस्त केली आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पाकिस्तानचे सातत्याने कुरापती करीत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच सीमेलगत सैन्यांची जमवाजमवही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही जोरदार तयारी सुरू केली असून, वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. सकाळी परराष्ट्र मंत्रालयाची बैठक झाली. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. याशिवाय तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची संरक्षण मंत्रालयात बैठक झाली.
भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात प्रारंभी पाकिस्तानच्या मुरीद चकवाल, सोरकोट आणि नूर खान हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला की भारताने त्यांच्या लढाऊ विमानांमधून या हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली. यासोबतच सरगोधा आणि सियालकोट एअर बेसवरही भारताने हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानचे लाँचपॅड उद्ध्वस्त केले. याच लाँचपॅडवरून भारतात ड्रोन हल्ले केले जात होते. मात्र भारतीय लष्कराने त्या लाँचपॅडवरच हल्ला केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानने सीमेवर हवाई हल्ले केले. भारतीय हवाई तळांवर हल्ले केले. पंजाबच्या एअर बेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तानकडून भारतावर फतेह-१ मिसाइलने हल्ला करण्यात आला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी फतेह-१ मिसाइल हवेतच नष्ट केले. फतेह-१ ही बॅलेस्टिक मिसाइल असून ती खतरनाक मानली जाते. परंतु भारतीय डिफेन्स सिस्टमने ते नष्ट केले.
दरम्यान, जम्मू सेक्टरमधील बीएसएफ चौक्यांवरही पाकिस्तानकडून गोळीबार केला. त्यालाही भारताने चोख प्रत्युत्तर दिलें. त्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सच्या चौक्या आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानने आॅपरेशन बुनयान अल मरसूस अंतर्गत हल्ले करण्यास सुरुवात केली. या अंतर्गत फतेह-१ क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले.
रेडिओ पाकिस्ताननुसार पाकिस्तानने आॅपरेशन बुनयान अल मरसूस सुरु केले. हे नाव कुरानमधील एका आयतमधून घेतले आहे. त्याचा अर्थ मजबूत भिंत असा आहे.
अमृतसरच्या मुगलानी कोट गावात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे अवशेष सापडले. अमृतसर शहरावर शुक्रवारी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पाकिस्तानचे क्षेपणास्त्र भारताने पाडले. हरियाणातील सिरसामध्ये रात्रीच्या सुमारास स्फोट झाला. पाकिस्तानने भारतीय शहरांवर हल्ले करण्याबाबतचे पुरावे जमा करण्याचे काम सुरु केले आहे. राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात पाकिस्तानी क्षेपणास्त्राचे अवशेष मिळाले.
सीमेवर पाकचे सैन्यही तैनात
पाकिस्तानने एकीकडे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू ठेवलेले असतानाच सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सीमेसोबतच पाकिस्तान पुढच्या भागातही सैन्य तैनात करत आहे.
३२ विमानतळे तात्पुरते बंद
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठे सुरक्षा पाऊल उचलले आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळे तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.